हुंडा दिला, मंडप सजला पण…; मुंबईत डॉक्टर तरुणीची वरपक्षाकडून मोठी फसवणूक, काय घडलं?

मुंबई : ओशिवरा येथील डॉक्टर तरुणीचे उत्तर प्रदेशमधील तरुणाशी लग्न जमले. दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने लग्नाची तारीख ठरली. वरपक्षाच्या मागणीनुसार घरातील वस्तूंसह सुमारे १० ते १३ लाख रोकड हुंडा म्हणून दिली. सर्व तयारी झाली, हॉलही सजला, मात्र वाट पाहूनही वर आणि वऱ्हाडी आलेच नाहीत… पैशाचा अपव्यय आणि आप्तस्वकीयांमध्ये बदनामी झाल्याने ओशिवरा येथील ही तरुणी व तिचे कुटुंबीय खचून गेले.

काय प्रकरण?

ओशिवरा येथे वास्तव्यास असलेल्या डॉक्टर तरुणीसाठी त्यांच्या परिचयातील व्यक्तीने उत्तर प्रदेशमधील उच्चशिक्षित तरुणाचे स्थळ आणले. पाहुणे बघायला येणार असल्याने पाहुणचारात कुठे कमी पडू नये म्हणून मिठाई, ड्रायफ्रूट, खाण्याचे अनेक पदार्थ अशी मेजवानी ठेवण्यात आली. दोघांनी एकमेकांना पसंद केल्यानंतर वराच्या कुटुंबीयांनी घरातील फ्रीज, टीव्हीपासून सर्व वस्तूंची मागणी केली. याशिवाय १० ते १२ लाख रुपये रोख रक्कम हुंडा म्हणून मागितली. सुरुवातीला डॉक्टर तरुणीच्या घरच्यांनी नकार दिला. मात्र स्थळ चांगले असल्याने त्यांनी विचार केला आणि हुंडा देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीने लग्नाची तारीख ठरवण्यात आली.

Sonakshi Sinha Marriage : सोनाक्षी सिन्हा लग्नानंतर धर्म बदलणार? सासरे इकबाल रत्नासी यांनी दिलं उत्तर; म्हणाले, हे लग्न…
बोलणी झाल्यानंतर जवळपास दोन ते तीन महिन्यांनी लग्न असल्याने त्याआधीच उत्तर प्रदेशच्या व्याही कुटुंबाने बोलणीत ठरलेल्या वस्तू व पैसे देण्याची मागणी केली. त्यानुसार डॉक्टर तरुणीच्या कुंटुबाने सर्व वस्तू आणि रोख रक्कम दिली. लग्नाच्या आदल्या दिवशी वरपक्ष आणि वऱ्हाडी येणार असल्याने त्यांच्यासाठी हॉटेल बूक करण्यात आले. हॉलमधील मंडप सजवण्यात आला. आदल्या दिवसापासून लग्नाच्या दिवसापर्यंत नव्हे तर मुहूर्तापर्यंत मुलीकडून मंडळी वाट पाहत होती. मात्र वर आणि वऱ्हाडी आलेच नाहीत. मुलीकडच्यांनी मध्यस्थीमार्फत संपर्क साधला असता, लग्न करायचे नसल्याचे वराकडून सांगण्यात आले. फसवणूक झाल्याने डॉक्टर तरुणीने ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.