कुठे गेला दीड पट हमीभाव?
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार आम्हाला हमीभाव द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. ती मागणी पूर्ण करण्याचा शब्द केंद्रातील मोदी सरकारने दिला. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याची त्यांनी वल्गना केली. सरकारने कोणत्याही शेतीमालाला दीडपट हमीभाव दिलेला नाही. २०१३ मध्ये शेतकऱ्याला जो सोयाबीनचा भाव मिळत होता, तो भाव आत्ताही मिळत असेल तर कुठं गेला दीड पट हमीभाव? असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला.
कमिशनखोर सरकारला जीएसटी कुठे लावावा ते ही कळत नाही
हेलिकॉप्टर खरेदी करत असताना ५ टक्के जीएसटी, हिरे खरेदी करत असताना ३ टक्के जीएसटी, सोने खरेदी करत असताना २ टक्के जीएसटी आहे. पण त्याचवेळी शेतकऱ्यांच्या खतांवर, बी बियाण्यांवर, ट्रॅक्टर आणि शेतीपयोगी अवजारांवर १८ टक्के जीएसटी लावला गेला. म्हणजेच हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे आहे. जीएसटी कुठे लावावा, हे कमिशनखोर आणि टक्केवारी सरकारला कळत नाही. अगदी अंत्यविधीच्या सामानावर १८ टक्के जीएसटी यांनी लावला. म्हणजेच या सरकारने जगणं नाही तर मरणसुद्धा महाग केले आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
कांद्याची निर्यातबंदी का केली? याचे उत्तर द्या
गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला केंद्र सरकार निर्यातीची परवानी देते पण दुसरीकडे लाल कांदा पिकवणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला निर्यातीची परवानगी नाकारली जाते. राज्यात शेतकऱ्यांचे हाल होत असताना आपले उपमुख्यमंत्री फडणवीस केंद्र सरकारचे आभार कसे मानायचे? असा सवाल त्यांनी केला.
कमिनशसाठी मंत्रालयातील प्रत्येक माळ्यावर दलालांना स्वतंत्र कक्ष
खान्देशात बियाणांचा पुरवठा झालेला नाही. खतांचा तुटवडा करून काळ्या बाजारात खते विकण्याचे पाप सरकारकडून होत आहे. चढ्या भावाने खते विका, पण आमचा हफ्ता आम्हाला द्या, अशी सरकारची भूमिका आहे. त्याचवेळी राज्याच्या प्रमुखापासून ते सरकारमधील मंत्र्यांपर्यंत सगळ्यांनीच कमिनशसाठी मंत्रालयातील प्रत्येक माळ्यावर दलालांना स्वतंत्र कक्ष दिले गेले आहेत. त्या कक्षात तोडपाणी सुरू आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. या सरकारचा शेतकरीविरोधी चेहरा विधिमंडळात मांडू, असे वडेट्टीवार म्हणाले.
निवडणूक निकालांत जनतेने गद्दारांना जागा दाखवली
महायुती सरकारने राज्याला खड्ड्यात घालण्याचे काम केले. दोन वर्षांपूर्वी अभद्र युती आणि अनैतिक संगत राज्याला पाहायला मिळाली. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांत फुगलेल्या छातीतील हवा काढण्याचे काम जनतेने केले. इथल्या जनतेला हुकूमशाही पसंती नाही. त्याचमुळे राज्यासह देशातील जनतेने गद्दारांना जागा दाखवली. दडपशाहीने कोणताही देश चालू शकत नाही, हा संदेश लोकसभा निवडणूक निकालाने दिला, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.