हिजाबनंतर आता मुंबईतील या कॉलेजकडून जीन्स-टीशर्टवर बंदी, विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये येण्यापासून रोखलं

मुंबई : मुंबईतील आचार्य आणि मराठे कॉलेजमध्ये हिजाब कॉन्ट्रोवर्सीनंतर आता नवा वाद समोर आला आहे. कॉलेजने विद्यार्थ्यांना रिप जीन्स-टॉप घालण्यावर बंदी घातली आहे. कॉलेजकडून २७ जून रोजी ड्रेस कोडबाबत एक नोटिस जारी करण्यात आली आहे. या नोटिसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, रिप जीन्स, टीशर्ट, जर्सी तसंच अंग प्रदर्शन करणारे कपडे न घालण्याचं सांगण्यात आलं आहे. मुला-मुलींना दोघांनाही जीन्स-टीशर्ट घालण्यावर बंदी आहे.

चेंबूर येथील आचार्य आणि मराठे कॉलेजमध्ये सोमवारी कॉलेजमध्ये जीन्स आणि टी-शर्ट घालून आलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश करण्यापासून रोखलं होतं. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. याआधी कॉलेजने हिजाबवर बंदी आणली होती. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं होतं. उच्च न्यायालयात कॉलेजने हा निर्णय ड्रेसकोड सुनिश्चित करण्यासाठी घेतला आहे. यामुळे कोणत्याही धर्माला किंवा समुदायाला निशाणा बनवण्याचा कोणताही उद्देश नसल्याचं कॉलेजने सांगितलं होतं. यावर उच्च न्यायालयाने हे योग्य असल्याचं म्हटलं होतं.
Eknath Shinde : संयम सुटत असेल मात्र तो राखा, कारण तुम्हाला यापुढेही विरोधातच बसायचं आहे, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

सामान्य कपडे घालण्याच्या सूचना

मुंबईतील चेंबूर येथील आचार्य आणि मराठे कॉलेजच्या प्राध्यापक डॉ. विद्यागौरी लेले यांनी काढलेल्या नोटिशीत असं सांगण्यात आलं आहे, की विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या परिसरात सामान्य कपडे घालावेत. कॉलेज प्रशासनाने घेतलेल्या जीन्स न घालण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनावर संकुचित वृत्तीचा आरोप केला आहे. तसंच ड्रेस कोडवरील नियम त्यांच्या धर्म आणि संस्कृतीच्या स्वातंत्र्याच्या घटनात्मक अधिकाराचं उल्लंघन करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. एका विद्यार्थ्याने याबाबत बोलताना सांगितलं, की मी जीन्स घातली होती. हा माझा रोजचा पोषाख आहे. मात्र कॉलेजला पोहोचल्यावर कॉलेजच्या गेटवरच सुरक्षा रक्षकाने अडवलं. तसंच जीन्स घालणं काही चुकीचं नाही. कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांची सध्याची, आताची जीवनशैली पाहून आपली मानसिकता बदलावी असं म्हटलं आहे.
Pune News : भुशी डॅम दुर्घटनेनंतर पुण्यात आणखी एक दुर्घटना, लेकीच्या डोळ्यादेखत वडील वाहून गेले; राष्ट्रीय खेळाडूचा दुर्देवी अंत

४०हून अधिक विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये येण्यापासून रोखलं

कॉलेजने ड्रेसकोडबाबत नोटीस काढल्यानंतर जवळपास ४० विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. जीन्स-टीशर्ट घालून आलेल्या मुला-मुली दोघांनाही बाजूला उभं करण्यात आलं होतं. कॉलेजच्या प्राध्यापकांनी सांगितलं, की त्यांना काही विशेष प्रकारच्या जीन्स आणि टीशर्टवर आक्षेप आहे. विद्यार्थ्यांनी सभ्य कपडे घालावेत. आम्ही कोणताही यूनिफॉर्म दिलेला नाही. पण विद्यार्थ्यांना सभ्यता बाळगणारे कपडे घालण्यास सांगितलं आहे. विद्यार्थ्यांना नोकरी लागल्यानंतर त्यांनी अशाच प्रकारचे कपडे घालण्याची अपेक्षा असते. या कपड्यांबाबत विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशावेळीच सांगण्यात आल्याचं प्राध्यापिका म्हणाल्या.

विद्यार्थ्यांच्या कपड्यांबाबत बोलताना कॉलेज प्रशासनाने सांगितलं, की वर्षातील ३६५ दिवसांपैकी विद्यार्थ्यांना केवळ १२० ते १३० दिवस कॉलेजला यावं लागतं. केवळ या दिवसांत ड्रेस कोडचं पालन करण्यात विद्यार्थ्यांना कोणतीही समस्या असू नये. विद्यार्थ्यांकडून कॅम्पसमध्ये कोणत्याही चुकीच्या घटना न घडण्यासाठी प्रशासनाने हा नवा ड्रेस कोड आणला आहे.

मागील वर्षी धार्मिक चिन्हांसह हिजाबवर बंदी

मागील वर्षी आचार्य आणि मराठे कॉलेजने ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ड्रेसकोड ठेवला होता. त्यात इतर सर्व धार्मिक चिन्हांसह हिजाबवर बंदी घालण्यात आली होती. कॉलेजच्या गेटमधून आत गेल्यावर एका नियुक्त ठिकाणी हिजाब काढण्यास सांगितलं गेलं होतं. आता पुन्हा एकदा कॉलेजने रिप जिन्स आणि टीशर्ट, जर्सीवर बंदी घातल्याने पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे.