या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून पिंपरी चिंचवड खंडणी विरोधी पथकाने दुचाकी स्वराचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. दहशत पसरवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक तरुण गाडीवर बसून हातात पिस्तूल हवेत फिरवताना पाहायला मिळत आहे.
याप्रकरणी चिखली पोलिसांनी कुणाल साठे नावाच्या तरुणाला अटक केली असून त्यातील अन्य साथीदारांवर गुन्हे दाखल केले आहेत. यातील एक गुन्हेगार अल्पवयीन आहे. यश कांबळे,सुशील बारक्या आणि रोहित मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात याआधी सुद्धा अशीच काही रील स्टारची प्रकरणे समोर आलेली पाहायला मिळाली आहेत.
दुचाकीवर बसून हा व्हिडिओ त्यांच्या साथीदाराने काढला आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणात डोके वर काढल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया वापरताना आपल्याकडून कोणतीही चुकीची माहिती किंवा चुकीचा व्हिडिओ नागरिकांपर्यंत जात नाही ना याची काळजी घेणे प्रत्येकाचे काम आहे. असे जर आढळल्यास पोलिसांकडून याबाबत कठोर पावले उचलली जातील, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरात कायदा सुव्यवस्था नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याआधी सुद्धा पुण्यात अशाच प्रकारे रील स्टार यांच्या विचित्र कारनाम्यावर पुणे पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.