हलगर्जी नको, प्रत्येकावर माझी नजर, सर्वांचं ऑडिट होणार, पुण्यात माजी नगरसेवकांना फडणवीसांचा दम

पुणे : ‘पुणे, बारामती आणि शिरूर मतदारसंघांतील महायुतीचे तिन्हीही उमेदवार निवडून आले पाहिजेत. जो काम करेल, ज्याचा निकाल चांगला आहे, त्यांच्या पाठिशी मी आहे. शिरूर, बारामती; तसेच मावळमध्ये ‘कमळ’ नव्हते म्हणून मित्रपक्षांचे चिन्ह पोहोचले नाही, अशी तक्रार नको आहे. पुण्यातील उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आला पाहिजे. कोणीही हलगर्जीपणा करता कामा नये. तुम्हा सगळ्यांवर माझी नजर असून, सगळ्यांचे ‘ऑडिट’ होणार,’ असा दम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकांना आज पुण्यात दिला.

शहराच्या मध्यवस्तीतील एका अलिशान हॉटेलमध्ये नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी झाडून महापालिकेचे माजी नगरसेवक उपस्थित होते. जे दोन-तीन नगरसेवक अनुपस्थित होते, ते का उपस्थित नाहीत, याची माहितीही फडणवीस यांनी या वेळी घेतली. या बैठकीसाठी फडणवीस यांच्या समवेत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ, उमेदवार प्रतिनिधी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह ९०हून अधिक माजी नगरसेवकांची उपस्थिती होती.
ठाकरे विरुद्ध शिंदे, भाजप विरुद्ध काँग्रेस, ४० मतदारसंघात दुरंगी लढती, कुठे काय चित्र?
पुणे लोकसभा मतदारसंघातील काही नगरसेवकांची प्रचारादरम्यान असलेल्या हलगर्जीपणाबद्दल फडणवीस यांनी थेट बोट ठेवले. ‘या प्रचारात माझे सर्वांवर लक्ष आहे. त्यासाठी आपली स्वतंत्र यंत्रणा येथे कार्यान्वित आहे. कोण काय करत आहे, याची खडानखडा माहिती आपल्याला मिळते. प्रचारामध्ये छोट्या सभा घेणे आवश्यक आहे. अगदी १५ ते २० नागरिकांना एकत्र करून त्यांच्याशी चर्चा करणे आवश्यक आहे. अशा छोटेखानी सभांचा फायदा नागपूर येथे चांगला झाला आहे. नागपुरात अशा प्रकारे सुमारे नऊ लाख नागरिकांपर्यंत पोहोचता आले,’ असे फडणवीस यांनी या वेळी सांगितले. ‘पुण्यातही अशाच प्रकारे प्रचार आवश्यक असून, पुढील आठवडाभरात मोठ्या संख्येने अशा सभा पार पडतील,’ अशी अपेक्षा त्यांनी नगरसेवकांकडे व्यक्त केली. प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली असून, सर्व माजी नगरसेवकांशी संपर्क झाला आहे. कोणाला काही अडचण असेल, तर त्या सोडविण्यासाठी मी येथे असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
फडणवीसांचे राजकारण सुडाचे नाही; ओन्ली राष्ट्र-नो महाराष्ट्र माझी भूमिका, तावडे दिल्लीतच

‘मित्रपक्षांचे चिन्ह घरोघरी पोहोचवा’

‘पुणे लोकसभेबरोबरच आजुबाजूच्या शिरूर, बारामती आणि मावळ मतदारसंघांतील नगरसेवकांनीही अशाच प्रकारे काम करणे अपेक्षित आहे. पिंपरी-चिंचवड येथील नगरसेवकांशीही चर्चा करणार आहे. शिरूर, बारामती आणि मावळ लोकसभा मतदारसंघांत मित्रपक्षांचे चिन्ह घरोघरी पोहोचले पाहिजे. २०१४च्या निवडणुकीत महादेव जानकर यांचे चिन्ह पोहोचविण्यात यशस्वी ठरलो होतो; तसेच काम या निवडणुकीतही अपेक्षित आहे. या मतदारसंघामध्ये ‘कमळ’ चिन्ह नव्हते म्हणून ते पोहोचले नाही, अशी तक्रार येता कामा नये,’ अशी तंबीही देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नगरसेवकांना दिली.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

फडणवीस म्हणाले…

– याद्यांचे वाचन करा, त्यातील अडचणी समजून घ्या.
– मतदार केंद्रावरील व्यवस्थेवर लक्ष ठेवा.
– मतदारांना मतदानास येण्यासाठी त्रास होणार नाही, याची काळजी घ्या.
– छोट्या सभा घेऊन मतदारांना विश्वासात घ्या.