सेनेचे आज ‘दोन’ वर्धापन दिन, मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन तर उद्धव करणार शक्तिप्रर्शन

प्रतिनिधी, मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि शिवसेना (उबाठा) पक्षाला मिळालेले यश आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा ५८वा वर्धापन दिन आज, बुधवारी साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे षण्मुखानंद सभागृहात, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरळीच्या डोम येथे वर्धापन दिन साजरा करणार आहेत. हे दोन्ही नेते यावेळी नेमके काय भाष्य करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे विरोधकांना काय प्रत्युत्तर देतात?

राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उबाठा) पक्षाने नऊ, तर शिवसेनेने सात जागांवर विजय मिळवल्याने दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावलेले आहे. मात्र महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीला चांगले यश मिळवल्याने शिवसेना (उबाठा) पक्षात जरा जास्त उत्साह आहे. लोकसभेतील यशामुळे विधानसभा निवडणूकही एकत्र लढवण्याचा निर्णय आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना कोणता संदेश देणार, कोणते राजकीय भाष्य करणार किंवा कुणाला लक्ष्य करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या मेळाव्याला पक्षाचे सर्व नेते, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, विभागप्रमुख, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यावेळी महायुतीकडून ‘फेक नरेटिव्ह’वरून करण्यात येणाऱ्या टीकेला उद्धव काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणेही उत्सुकतेचे असणार आहे.
ट्रेन चालवताना डोळ्यासमोर आले १० सिंह! लोको पायलटने प्रसंगावधान दाखवत थांबवली ट्रेन अन्…

दरम्यान, वरळी येथील डोम येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखालीसुद्धा शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. मुंबईतील सध्याचा बहुचर्चित उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकाल, राखलेला ठाण्याचा गड आणि सात जागांवर मिळवलेला विजय, यांमुळे पक्षकार्यकर्त्यांचा उंचवलेला आत्मविश्वास कायम ठेवण्यासाठी शिंदे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या हस्ते सदस्य नोंदणीलाही सुरुवात होण्याची शक्यता आहे.

फलकबाजी आणि शक्तिप्रदर्शन

लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या यशानंतर आज होणारा शिवसेनेचा हा पहिलाच वर्धापन दिन असल्याने यासाठी मुंबईत ठिकठिकाणी बॅनर व फलक लावण्यात आले आहेत. वरळी आणि माटुंगा परिसरात दोन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणात भगवे झेंडेही लावण्यात आले आहेत.

सेनाप्रमुखांच्या स्मारकाचे २३ जानेवारीला लोकार्पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानी होत असलेल्या राष्ट्रीय स्मारकारचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. २३ जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त हे स्मारक सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. उद्धव यांनी मंगळवारी शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. माजी मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, तेजस ठाकरे आदी याप्रसंगी उपस्थित होते. जुलैअखेरपर्यंत स्मारकाचे बांधकाम पूर्ण होऊन ऑगस्टमध्ये अंतर्गत कामाला सुरुवात होईल, असेही त्यांनी नमूद केले.