सरसकट कारवाई कशाला? पब-बार बंद, हजारो जणांचा रोजगार बुडाला, कर्मचारी हवालदिल

पुणे : नियम मोडल्याप्रकरणी ३२ पब आणि बारला राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाळे ठोकल्याच्या निषेधार्थ शेकडो बारमालक, बारचालक आणि कर्मचाऱ्यांनी राजा बहादूर मिल परिसरात शुक्रवारी आंदोलन केले. बार बंद केल्याने हजारो लोकांचा रोजगार जाईल; तसेच हा व्यवसाय ठप्प होऊन अर्थकारण पूर्ण थांबेल, अशी तक्रार करून सरसकट कारवाई नको, अशी मागणी बारमालक आणि कर्मचाऱ्यांनी केली.

अल्पवयीन मुलांना मद्यविक्री करणे, रात्री दीडनंतरही बार सुरू ठेवणे, बेकायदा मद्यसाठा करणे, या कारणांमुळे शहरातील ३२ पब, रूफटॉप रेस्टॉरंट आणि बारला उत्पादन शुल्क विभागाने टाळे ठोकले आहे. यामध्ये चौदा ‘पब’चा समावेश आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईच्या निषेधार्थ शेकडो बारमालक, बारचालक आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. तीन ते पाच दिवसांपासून बार बंद असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन कसे द्यायचे, वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क कसे भरायचे, सामान खरेदी केलेल्यांचे शुल्क कसे द्यायचे, असा सवाल लाउंज बार असोसिएशनने उपस्थित केला. बार बंद असल्याने उत्पन्न पूर्ण थांबले आहे. अशा प्रकारे कारवाई झाली, तर हॉटेल व्यवसाय डबघाईला येईल. नियम मोडणाऱ्या बारवर कारवाई व्हावी; मात्र सरसकट बारवर कारवाई चुकीचे असल्याचे बारमालकांनी सांगितले.
Dombivli Blast : डोळ्यात आशा, जीवलगांचा शोध, डोंबिवली स्फोट दुर्घटनास्थळी कुटुंबं सैरावैरा, यंत्रणांची अनास्था
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलांना प्रवेश देणाऱ्या पबवर कारवाई योग्य असून, इतर बार आणि पबला तशीच वागणूक देणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी जमावाला हुसकावले

कर्मचाऱ्यांना पुढे करून बारमालक आंदोलन करीत असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी या जमावाला हुसकावून लावले. आंदोलनासाठी परवानगी घेतली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
अगरवालांच्या तीन पिढ्या कायद्याच्या कचाट्यात, पोर्शे अपघात प्रकरणी आजोबा सुरेंद्रकुमारही अटकेतRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

उत्पादन शुल्क विभागाची मोहीम

बारकडून नियमांचे पालन होते का, या तपासणीसाठी उत्पादन शुल्क विभागाकडून धडक मोहीम राबविली जात आहे. तीन दिवसांत ‘पब’, ‘रूफटॉप हॉटेल’ व ‘बार’ अशा ३२ परवानाधारकांवर विविध नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून ते ‘सील’ करण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यापासून ५४ परवानाधरकांवर गुन्हे नोंदवून पाच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.