रोहित पवारांनी तर बारामतीतील पराजयाची प्रत्यक्ष कबुलीच दिली, सुनील तटकरेंचा खोचक टोला

मुंबई : बारामतीमध्ये निकाल नेमका काय लागणार आहे. याची रोहित पवार यांनी पराजयाची अप्रत्यक्ष नाहीतर प्रत्यक्ष कबुली ट्विटच्या माध्यमातून दिली आहे, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांना लगावला आहे.

सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तटकरेंनी महायुतीला राज्यात अनुकूल वातावरण असल्याचे सांगत रोहित पवारांनी केलेल्या ट्विटवर टीका केली आहे. तटकरे म्हणाले, ‘राज्यात चारही टप्प्यांपर्यंत महाराष्ट्रात झालेले एकूण मतदान महायुतीला अनुकूल आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जागा आमच्याकडेच राहणार आहेत. तर शेवटच्या टप्प्यात मुंबईसह ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक आहे, यादरम्यान देखील आम्हाला अनुकूल असलेल्या गोष्टींनाच वेग येईल. महायुतीला निश्चितच चांगलं यश मिळेल.’
एक तास CCTV बंद असणे गंभीर, निवडणूक आयोगाने अधिक काळजी घ्यायला हवी होती : युगेंद्र पवार
महायुतीची लहर आहे, असे विरोधक मुळीच म्हणणार नाहीत आणि ते स्वाभाविकच आहे. त्यांना कार्यकर्त्यांचे आणि मतदारांच्या मनात विश्वास टिकून राहावा याच हेतूने बोलायचं असतं, सत्य परिस्थिती फार वेगळी आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान अद्याप बाकी असल्याने विरोधकांनी असे वक्तव्य केले असावे, मात्र यापेक्षा ग्राऊंड रिअ‍ॅलिटी फार वेगळी आहे, अशी टिप्पणी तटकरे यांनी यावेळी केली.

खडकवासलातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत तटकरे म्हणाले की, खडकवासला विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना फार मोठी आघाडी मिळेल. २०१९ मध्ये भाजपला मिळाली होती, त्यापेक्षा जास्त आघाडी मिळेल सुनेत्रा वहिनींची असेल. आम्ही सर्व जागा महायुतीमध्ये लढत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आम्ही जरी जागा लढल्या असल्या तरी महायुती म्हणूनच राज्यात सर्वाधिक जागा जिंकणार आहोत.
Eknath Shinde: २०१९ ला काय झालेलं, युती का तुटली? फडणवीसांचे ५० फोन, ठाकरेंचं उत्तर, शिंदेंनी सारं सांगितलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण आणि मुंबईत सभा होत असून या सभेचे नियोजन तिन्ही पक्षांचे नेते करत आहेत. मी स्वतः बुधवारी कल्याण येथे होत असलेल्या महायुतीच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहे. मोदींची मुंबईतील सभा यशस्वी करणे हे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे व घटक पक्षाचे कर्तव्य आहे, असे देखील सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले.