मोठा दिलासा! ससूनमध्ये लवकरच ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’; रुग्णांना सर्व औषधे रुग्णालयातच उपलब्ध होणार

प्रतिनिधी, पुणे : ससून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना बाहेरून औषधे आणावी लागू नयेत यासाठी प्रशासनाने उपाययोजना करणे सुरू केले आहे. रुग्णांना बाहेरील औषधे (झिरो प्रिस्क्रिप्शन ) लिहून देऊ नये, असा आदेश डॉक्टरांना देण्यात आला आहे. अत्यावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी औषध खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ‘ससून’मध्ये येणाऱ्या रुग्णांना आता बाहेरून औषधे आणावी लागणार नाहीत, असा दावा प्रशासनाने केला आहे.

रुग्णालयात सर्व प्रकारची औषधे मिळत नाहीत, अशा तक्रारी काही दिवसांपूर्वी रुग्णांनी केल्या होत्या. एका निवासी डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे आणायला सांगितल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला होता. या घटनेनंतर ‘ससून’मध्ये औषधे का मिळत नाहीत आणि डॉक्टर बाहेरील औषधे का लिहून देतात, असा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे आता रुग्णालयात उपलब्ध असलेली औषधे लिहून द्यावीत; तसेच बाहेरील औषध आणा अशी चिठ्ठी रुग्णांना लिहून देऊ नये, असा आदेश प्रशासनाने दिला आहे.

औषध खरेदीचा निर्णय

रुग्णालयातच औषधे मिळावी यासाठी औषध खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार काही औषधांचा पुरवठा झाला आहे. तर काही औषधांचा पुरवठा येत्या आठ ते पंधरा दिवसांमध्ये होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

प्रशासनाकडून आढावा

औषध वितरणामध्ये नेमक्या काय चूका आहेत, याचा आढावा प्रशासनाने घेतला. यामध्ये काही विभागातील डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध नसलेली औषधे लिहून देत असल्याचे समोर आले. काही डॉक्टरांनी सनस्क्रीनसारखे सरकारी रुग्णालयात न मिळाणारे औषधे लिहून दिले होते. अनेकदा महागडी औषधे आणि इंजेक्शन सरकारी रुग्णालयात मिळत नाही. मात्र, या औषधांची गरज असलेले रुग्ण ही औषधे घेण्यासाठी ‘ससून’मध्ये येतात.
20 वर्षे नो काम, पण फूल पगार; महिलेने कंपनीला कोर्टात खेचलं, कारणही सांगितलं…
औषधे कमी पडणार नाही, यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्णालयात उपलब्ध असलेलीच औषधे रुग्णांना लिहून द्यावीत, बाहेरील औषधे लिहून देऊ नयेत, अशी सूचना डॉक्टरांना दिली आहे. रुग्णांना बाहेरून औषधे आणावी लागू नयेत यासाठी ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ धोरण राबविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. औषधांची मागणी केली असून, येत्या आठ ते पंधरा दिवसांमध्ये ती उपलब्ध होतील.- डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय