बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, त्याच मनुस्मृतीचा अभ्यास विद्यार्थांनी करायचा का?
भाजपा-आरएसएस संविधान बदलून देशात मनुस्मृती लागू करू पाहत आहे हे उघड आहे. लोकसभेत ४०० जागांच्या बहुमतासह सत्ता मिळाली की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार अशी जाहीर भाषा भाजपाच्या नेत्यांनी केली आहे आणि आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जाहीर झालेला महाराष्ट्र राज्याच्या शालेय अभ्यासक्रम आराखड्यात (एससीएफ) मूल्ये आणि स्वभाववृत्ती या घटकाची सुरुवात मनुस्मृतीतील श्लोकाने करण्यात आली आहे. ज्या मनूस्मृतीमुळे वर्णव्यवस्था निर्माण केली, बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे पाप केले, ज्या मनूस्मृतीमध्ये महिलांना समाजात दुय्यम स्थान देण्यात आले आणि ज्या मनुस्मृतीला महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातांनी जाळले त्याच मनुस्मृतीचा अभ्यास शाळकरी विद्यार्थांनी करायचा का? असा संतप्त सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
भाजपाला संविधान बाजूला सारून देशात मनुस्मृती लागू करायची आहे
संविधानातील व्यापक मूलतत्त्वे, सर्वसमावेशकता विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी महाविकास आघाडी सरकारने संवैधानिक शिक्षण अधिक व्यापकपणे शालेय शिक्षणात अंतर्भूत करावे याकरिता प्रक्रिया सुरू केली होती पण मनुवादी सरकारने ती प्रक्रिया थांबवली आणि आता ते मनुची विभाजनकारी मूल्ये विद्यार्थ्यांच्या निरागस मनावर लादण्याच्या तयारीत आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजपाला संविधान बाजूला सारून देशात मनुस्मृती लागू करायची आहे. सरकारच्या या समाजविरोधी, संविधानविरोधी, विद्यार्थी विरोधी निर्णयाचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आहे, असेही गायकवाड म्हणाल्या.
इंग्रजी भाषेला ‘परकीय भाषा’ म्हणून वर्गीकरण करण्याचे धोरण विद्यार्थीविरोधी
मविआ सरकार असताना सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची केली होती मात्र, एससीएफमध्ये त्याबद्दल ही विसंगती दिसून येते. शिवाय इंग्रजी भाषेला ‘परकीय भाषा’ म्हणून वर्गीकरण करण्याचे धोरण देखील विद्यार्थीविरोधी आहे. भाजपा सरकार हे समाजाच्या एकात्मतेला, समतेला आणि लोकशाहीला धोका निर्माण करणारे असल्याने त्यांना धडा शिकवला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.