पोर्शे अपघातानंतर अजित पवारांचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन? दादांनी सारं काही स्पष्ट सांगितलं

पुणे: पुणे पोर्शे अपघाताने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणात पोलिस रोज नवनवीन गोष्टी उघड करत आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या काही नेत्यांवरही विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. त्यात आता अजितदादांनी पोर्शे अपघातानंतर पुणे पोलिस आयुक्तांना फोन केल्याच्या चर्चा होत्या. आता यावर स्वत: अजित पवारांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. अपघातानंतर सोमवारी (२० मे) त्यांनी पोलिस आयुक्तांना फोन केल्याचं सांगितलं.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, “लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हाला अशा प्रकरणांबाबत फोन येत असतात. मी पोलिस आयुक्तांना फोन केला आणि सांगितले की आरोपी मुलगा हा एका श्रीमंत कुटुंबातील आहे आणि पोलिसांवर दबाव आणण्याची शक्यता आहे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नका, असं मी त्यांना सांगितलं होतं, असं म्हणत अजितदादांनी सारं स्पष्ट केलं.
रुग्णवाहिका येतेय, अर्धा तास द्या; अश्विनीचा मृतदेह ठेवण्यास ससून रुग्णालयाचा नकार अन् आता..
अजित पवारांनी पोर्शे अपघातानंतर पुणे पोलिसांना फोन केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. ज्याला आता अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.

अपघातातील आरोपीच्या पालकांना दोष देत अजित पवार म्हणाले की, पालकांनी त्याच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले, ज्यामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाला. “पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाचे वर्तन अत्यंत बेजबाबदार आहे. त्याच्या पालकांनी त्याच्या वागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे घडलं. मुलगा निरीक्षण गृहात आहे आणि त्याचे वडील आणि आजोबा यांना अटक करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघातानंतर पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात आलेले त्यांच्या पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांच्याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, “टिंगरे यांनी स्वत: त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. नंतर त्यांनी पुण्यात माझी भेट घेतली आणि त्यांची बाजू मांडली. तपासात हलगर्जी करणाऱ्या दोषी पोलिसांवर आणि डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.