नियमबाह्य होर्डिंगना दणका; आयुक्तांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर, कारवाईसाठी पालिकेचे खास प्लॅनिंग

प्रतिनिधी, पुणे : शहरातील किती होर्डिंग नियमानुसार आणि किती नियमबाह्य आहेत, याचा शोध घेण्यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी पालिकेचीच स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली. या यंत्रणेने शहरभर फिरून नियमबाह्य होर्डिंगचे फोटो काढले. गुरुवारी आयुक्तांच्या उपस्थितीत अतिरिक्त आयुक्तांनी या होर्डिंगचे फोटो परिमंडळ, क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह आकाशचिन्ह निरीक्षकांसमोर दाखवले. पितळ उघडे पडल्याने या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. होर्डिंगबाबतच्या सरकारच्या नियमावलीबाबत आकाशचिन्ह विभागाच अनभिज्ञ असल्याचेही या बैठकीत समोर आले.

अधिकाऱ्यांची कानउघाडणी

शहरातील होर्डिंगसंदर्भात अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी गुरुवारी पालिकेत बैठक घेतली. या बैठकीत पालिकेचे सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्त, परिमंडळ उपायुक्त, आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त व अन्य अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनीही अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

Nashik News : सिन्नरसाठी नदीजोड प्रकल्पाचा अहवाल राज्यस्तरीय समितीपुढे सादर, असा असेल प्रकल्प…

एका इमारतीवर अनेक होर्डिंग

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने शहरातील अनधिकृत होर्डिंग काढून टाकली. मात्र, अनेक अधिकृत होर्डिंग नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आली आहेत. काही ठिकाणी केवळ एकाच बाजूची परवानगी असताना सांगाड्याच्या दोन्ही बाजूला होर्डिंग उभारण्यात आली आहेत. काही ठिकाणी होर्डिंगची उंची अधिक आहे, तर काही ठिकाणी एकाच इमारतीवर अनेक होर्डिंग आहेत. याशिवाय काही ठिकाणच्या होर्डिंगचा लोखंडी सांगाडाही धोकादायक अवस्थेत आहे.

बैठकीत वाचली नियमावली

या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी पालिकेचे काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना होर्डिंगच्या पाहणीसाठी पाठवले होते. त्यांनी शहरभर फिरून धोकादायक, नियमबाह्य होर्डिंगचे फोटो काढले. या बैठकीत त्या फोटोंचे सादरीकरण करून पृथ्वीराज बी. पी. यांनी आकाशचिन्ह विभागाच्या अधिकाऱ्यांना; तसेच क्षेत्रीय व परिमंडळ आयुक्तांना फैलावर घेतले. होर्डिंगसंदर्भातील सरकारच्या २०२२च्या नियमावलीबाबत आकाशचिन्ह विभागाचे अधिकारी, निरीक्षक अनभिज्ञ असल्याचे आढळल्याने बैठकीत नियमावली वाचून अधिकाऱ्यांना नियमांची स्पष्ट जाणीव करून देण्यात आली.

अधिकाऱ्यांकडून मागवला खुलासा

होर्डिंगबाबत सरकारने २०२२मध्ये नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यानुसारच होर्डिंग असली पाहिजेत; मात्र शहरात तसे चित्र नाही. त्यामुळे नियमबाह्य होर्डिंगकडे कोणाचे व कसे दुर्लक्ष झाले, त्याविरोधात कारवाई का झाली नाही, याचा खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘शहरातील सर्व (२,६४८) होर्डिंगचे फोटो मुख्य विभागाकडे पाठवावेत; त्याचबरोबर धोकादायक होर्डिंगविरोधात तातडीने आणि उर्वरित नियमबाह्य होर्डिंगविरोधात १५-२० दिवसांत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,’ असे पृथ्वीराज बी. पी. यांनी स्पष्ट केले. ‘ठेकेदाराने स्वतःहून नियमबाह्य होर्डिंग काढून घेतली नाहीत, तर पालिका त्याविरोधात कारवाई करेल आणि त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करेल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

…अन्यथा सेवेतून थेट निलंबन

‘नियमबाह्य होर्डिंगविरोधात कारवाई न केल्यास व होर्डिंगसंदर्भात दुर्घटना घडल्यास संबंधितांना सेवेतून थेट निलंबित केले जाईल,’ असा इशारा डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.