दोषींना सोडणार नाही, कारवाई होणारच, अजित पवार यांची पुणे अपघातावर ‘बहुचर्चित प्रतिक्रिया’

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने आपल्या आलिशान पोर्शे गाडीखाली दोन जणांना चिरडून मारल्याच्या घटनेनंतर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार याप्रकरणावर काहीच का बोलत नाहीत? असा प्रश्न राजकीय वर्तुळापासून सामाजिक वर्तुळातील लोक विचारत होते. अखेर आपल्या व्यग्र वेळापत्रकातून उसंत काढून अजित पवार यांनी दोषींना सोडणार नसल्याची ग्वाही देऊन कारण नसताना माझ्यासंबंधी गैरसमज पसरवला जातोय, अशी तक्रार केली. तसेच देशात कायदा सगळ्यांना समान असल्याचे सांगत माझे याप्रकरणावर बारकाईने लक्ष आहे, कितीही श्रीमंताच्या बापाचा पोरगा असू देत कारवाई होईलच, असा धीर पीडितांच्या कुटुंबियांना दिला.पुण्यात कल्याणीनगर येथे शनिवारी रात्री बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने बाईकस्वारांना उडवले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. शनिवारी घटना घडल्यानंतर पुढच्या १९ तासांत आरोपीला जामिनही मिळाला. पुण्याचे पालकमंत्री म्हणून याप्रकरणी अजित पवार यांच्या प्रतिक्रियेकडे किंबहुना भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागते होते. परंतु घटनेच्या ६ दिवसानंतर आज पुण्यातील एका शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवार यांनी माध्यमांना याविषयी आपली प्रतिक्रिया दिली.
अजित पवार बोलत नाही, तुमचेही आरोपीच्या वकिलाशी संबंध असल्याच्या चर्चा, शरद पवार चिडून म्हणाले…

कितीही श्रीमंत बापाचा पोरगा असू देत…

अजित पवार म्हणाले, “घटनेच्या पहिल्या दिवसापासून माझे लक्ष आहे. तसेच या प्रकरणावर आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली आहे. कुणावरही आकस बुद्धीने काही कारवाई होणार नाही. पण जे कुणी दोषी असतील ते किती मोठे असले, कितीही श्रीमंत असले, तरी रितसर कारवाई होईल. कायदा हा श्रीमंताला आणि गरिबालाही सारखाच आहे. नियम सगळ्यांना सारखे आहेत. त्याचप्रमाणे कारवाई चाललेली आहे”
ओला, उबर, ट्रक ड्रायव्हर यांना निबंध लिहायला सांगाल का? पुणे अपघातावर राहुल गांधी यांची सडेतोड भूमिका

कारण नसताना माझ्याबद्दल गैरसमज

मी २० आणि २२ मे रोजी मंत्रालयात होतो. सगळ्या घडामोडींवर माझे लक्ष होते. याविषयी गृहमंत्री फडणवीस यांच्याशी माझे बोलणे झाले होते. मी स्वत: पुण्याला जाऊन माहिती घेतो आणि पुढील कारवाईचे आदेश देतो, असे त्यांनी मला सांगितले. पुढे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीचे भाष्य केले. पण कारण नसताना पुण्याच्या पालमंत्र्यांचे याप्रकरणाकडे लक्ष नसल्याचा गैरसमज पसरवला जातोय, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

गतिमान कामाचं पालुपद!

त्याचवेळी माध्यमांसमोर मला सारखे यायला आवडत नाही. त्यांनाही ते चांगले माहिती आहे. माझे काम भले आणि मी भला, असा माझा स्वभाव आहे, असे म्हणत आपल्या गतिमान कामाचे पालुपद त्यांनी पुन्हा ऐकविले.