दादा, भाऊंना पाडण्याची तयारी, मविआच्या गोटात जोरदार हालचाली; दोन्ही उपमुख्यमंत्री रडारवर

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात ३० जागा जिंकत सत्ताधारी महायुतीला धक्का देणाऱ्या महाविकास आघाडीनं आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. कोणी मोठा भाऊ नाही, कोणी छोटा भाऊ नाही असं म्हणत मविआतील तिन्ही पक्ष विधानसभेला समान जागा लढवणार आहेत. मविआकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला जाणार नाही. याबद्दलचा निर्णय निवडणूक निकालानंतर घेतला जाईल.

महाविकास आघाडीनं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विधानसभा निवडणुकीत अडचणीत आणण्याची रणनीती आखली आहे. महायुती सरकारमधील दोन मोठ्या नेत्यांना त्यांच्याच होमग्राऊंडवर आव्हान देण्याची तयारी मविआनं सुरु केली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, अजित पवार अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. लोकसभेतील मविआची कामगिरी, महायुतीचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये मविआच्या उमेदवारांना मिळालेलं मताधिक्क्य पाहता विरोधकांनी व्यूहनिती आखण्यास सुरुवात केली आहे.
Ajit Pawar: शिखर बँक प्रकरणात अजितदादा अडचणीत; ED, EOWच्या वेगवेगळ्या भूमिका; क्लीन चिटला विरोध
काँग्रेसमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मविआचं नेतृत्त्व आणि काँग्रेस हायकमांडनं नैऋत्य नागपूर आणि बारामती मतदारसंघानं विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांचा पराभव घडवून आणणारे शरद पवार बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांना राजकीय धक्का देण्यास उत्सुक आहेत. त्यांचे बारामती दौरे वाढले आहेत. या दौऱ्यांमध्ये नातू युगेंद्र पवार त्यांच्या कायम सोबत असतात.
नाना करते प्यार.. फडणवीस भेटीवर ठाकरेंचं भाष्य; मविआचा चेहरा कोण? एका शब्दात विषय संपवला
लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी नागपूरमधून विजयी झाले. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून विकास ठाकरे मैदानात होते. नैऋत्य नागपूर विधानसभा मतदारसंघात गडकरींना ३३ हजार ५३५ मतांची आघाडी मिळाली. २०१९ मध्ये गडकरींना याच मतदारसंघात ५५ हजार ११६ मतांची आघाडी होती. गडकरींना यंदा या मतदारसंघात यंदा १.१३ लाख मतं मिळाली. त्यांना झालेलं मतदान २०१९ च्या तुलनेत ७ हजारांनी कमी आहे.

विदर्भात महाविकास आघाडीच्या विजयात डीएमके फॅक्टर महत्त्वाचा ठरला. दलित, मुस्लिम, कुणबी मतं मविआच्या बाजूनं वळली. विधानसभा निवडणुकीत नैऋत्य नागपुरात फडणवीसांना आणि बारामतीत अजित पवारांना धक्का देण्यासाठी ऑल इंडिया काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या सभा होऊ शकतात. ‘विधानसभेला तेली आणि कुणबी समाजाची किमान निम्मी मतं आमच्या बाजूनं वळली, तर दोन्ही दिग्गज नेते पराभूत होतील,’ असा विश्वास काँग्रेसमधील नेत्यानं व्यक्त केला.