‘तुमच्या घाणेरड्या सवयी गेल्या नाहीत…’ विधान परिषद निकालानंतर शरद पवारांच्या खास माणसाचा संताप

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. त्यामुळे महायुतीचे सर्व नऊ उमेदवार सहज विजयी झाले. तर महाविकास आघाडीला केवळ दोन जागा मिळाल्या. यामुळे आता राजकीय वातावरण तापलं आहे. यावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. अनेक नेते यावर आपले मत व्यक्त करत आहेत. तर नाना पटोलेंनी क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांना थेट इशाराच दिला आहे. अशातच आता शरद पवारांचे निकटवर्तीय जितेंद्र आव्हाड यांनी यावर ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. या गद्दारांना महाराष्ट्र धडा शिकवेल, असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये सांगितलं आहे.
लोकसभेला आपटले, विधान परिषदेला गाडी रुळावर, शिंदे-फडणवीस सातव्या आस्मानावर, विजयानंतर म्हणाले…

नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आज विधान परिषदेच्या निवडणुकीत जी काही मते फुटली किंवा फोडण्यात आली, त्याचे एकमेव कारण म्हणजे पैसा आणि विकासनिधी. म्हणजे जनतेच्याच पैशाचा खेळ ! विकासनिधी हा कुणी स्वतःच्या घरातून आणत नाही. जनतेच्या करातून सरकारी तिजोरीत जमा झालेला पैसा हा विकासनिधी म्हणून वापरला जातो. पण, या सरकारने तेही जमविले नाही. या सरकारने फक्त कर्जाचा डोंगर उभा केला अन् त्या कर्जाच्या डोंगरातूनच हे पैसे काढले जात आहेत. म्हणजेच, जनतेच्याच खिशाला कात्री लावण्याचे काम केले जातेय. पाच कोटी रूपये आणि शंभर कोटी रूपयांची कामे, अशी ऑफर प्रत्येक आमदाराला दिली जात होती. काही पैशांच्या अमिषाला बळी पडले.

स्वतःच्या राजकीय अस्तित्वाविषयी काळजी नाही; स्वतःच्या राजकारणाविषयी पुढे जाण्याची इच्छा नसेल तर त्याला कोण काय करणार? आजचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. यानंतर पुढे विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचे आहे. पण, जे आमदार फुटले आहेत; त्यांची नावे आज रात्री किंवा उद्या बाहेर पडणारच आहेत. त्यामुळे आपला आमदार पैसे घेऊन फुटला आणि पक्षाशी गद्दारी केली, हे पुन्हा एकदा जाहीर होईल. या गद्दारीविरोधात प्रचंड संताप जनतेच्या मनात आहे. गद्दारी करणाऱ्यांविरुद्ध तसेच गद्दारी करायला लावणार्‍यांविरोधातही जनतेच्या मनात रोष आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

ते पुढे म्हणाले की, पाच कोटी रूपये आणि १०० कोटींची विकासकामे हा दर ठरला होता. तुम्ही हे देऊन आमदारांना विकत घेऊ शकता; पण, जनतेला घेऊ शकत नाहीत. तुम्ही आमदारांना विकत घेताना खूप पैसे वाटले आहेत. आमदारांना विकत घेताना खूप अगदी हजार कोटी रूपयांचा विकासनिधी दिलात. पण, तुम्हाला कुठेच यश मिळू शकले नाही. म्हणून तुम्ही १७ वरच अडकले. तेव्हा जनतेला विकत घेऊ शकतो, या भ्रमात राहून आम्ही विधानपरिषद जिंकली आता विधानसभा जिंकू, हे विसरून जा. जनतेच्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड राग आहे. आजनंतर अधिक राग निर्माण होईल की अजून तुमच्या घाणेरड्या सवयी गेलेल्या नाहीत.