ताई त्यांनी औकात काढली! आमदार भरणेंनी शिवीगाळ केलेला कार्यकर्ता सुळेंसमोर ढसाढसा रडला

पुणे: बारामतीत पवार विरुद्ध पवार संघर्ष असताना मतदानाच्या दिवशी इंदापुरात अजित पवारांच्या निकटवर्तीय आमदारानं शरद पवारांच्या गटातील कार्यकर्त्यांला शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. इंदापूरचे आमदार दत्ता भरणे शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर बारामतीच्या खासदार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे त्या कार्यकर्त्याच्या भेटीला पोहोचल्या. घडलेला प्रकार त्यांनी जाणून घेतला आणि कार्यकर्त्याला धीर दिला.

आमदार भरणेंनी कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचा प्रकार समजताच सुळेंनी इंदापूर गाठलं. त्यांनी कार्यकर्ते नाना गवळींची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधत घडलेला प्रकार जाणून घेतला. ‘बूथवरुन काही वाद झाला नाही. भरणे त्यांच्या कारमधून उतरले. आपल्या बूथवर त्यावेळी गर्दी होती. त्यामुळे मी जरा बाजूला गेलो होतो. भरणे तिथे आले आणि त्यांनी थेट शिवीगाळच सुरु केली,’ असा घटनाक्रम गवळींनी कथन केला.
तुझी मस्ती उतरवेन! अजित पवारांच्या आमदाराची शिवीगाळ; VIDEO समोर, सुप्रिया सुळे संतापल्या
तुम्ही स्वत: त्यांना काही बोलला नाहीत ना, अशी विचारणा सुळेंनी केली. त्यावर आम्ही त्यांना काही बोललोच नव्हतो. त्यांनी कारमधून उतरल्यानंतर मला शिवी देण्यास सुरुवात केली. तुला गावात राहायचं आहे की नाही? तुझी काय औकात आहे? असं म्हणत त्यांनी शिव्या दिल्या. तरीही मी त्यांना काहीही बोललो नाही, असं गवळींनी सांगितलं.
सुप्रिया सुळे मतदान सुरु असताना अजित पवारांच्या घरी; चर्चांना उधाण, या भेटीमागे दडलंय काय?
आम्हाला रोहित दादांनी सूचना दिल्या होत्या. आपण लहान आहोत. आपल्याकडे सत्ता नाही. ते सत्तेचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करतील. अन्याय करायचा प्रयत्न करतील. तुम्ही एक शब्द बोलू नका, असं रोहित पवारांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे मी भरणेंच्या शिव्या ऐकून घेतल्या, अशी आपबिती गवळींनी कथन केली.
तुम्ही पाण्यासाठी काय केलं? आढळरावांना तरुणाचा सवाल; जाब विचारताच नेत्यांची बोलती बंद
पवार साहेब, रोहित दादा आणि ताईंकडे पाहून आम्ही भरणेंना मतदान केलं. आता तेच आम्हाला विचारतात तुझी औकात काय? ताई माझी आर्थिक कुवत नाही. मी कोणाला चहा पाजू शकत नाही, असं म्हणत गवळी धाय मोकलून रडले. तेव्हा सुळेंनी त्यांची समजूत काढली. तुम्ही रडू नका. धीर सोडू नका. ते बोलले असतील. पण मी तुमची माफी मागते, असं सुळे म्हणाल्या.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे इंदापूर तालुका अध्यक्ष मनोज साबळे उपस्थित होते. समोरच्या पक्षाकडून रात्री एका मतामागे १ ते २ हजार रुपये वाटण्यात आले, असा दावा त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे आता हे धमक्या देऊ लागल्या आहेत. हाणामारीवर आले आहेत, असा आरोप शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला.