ठाकरेंकडून मविआ सोडण्याचा इशारा, पवारांचे अनेक कॉल, पण नो रिस्पॉन्स; MLC निवडणुकीआधी घमासान

मुंबई: विधान परिषद निवडणुकीत महायुतीनं त्यांचे सगळेच्या सगळे ९ उमेदवार निवडून आणले. तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार जिंकले, तर शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढत असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. यानंतर आता महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. निवडणुकीआधी घडलेल्या घडामोडी आता पुढे येऊ लागल्या आहेत. आपला उमेदवार पराभूत झाल्यास महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी आघाडीतील अन्य घटक पक्षांना दिला होता.

विधान परिषद निवडणुकीपूर्वी झालेल्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, उमेदवार जयंत पाटील, ठाकरेसेनेचे नेते अनिल देसाई यांच्यात बैठक झाली. या बैठकीला शेकापच्या जयंत पाटील यांचे पुतणे निनाद पाटीलदेखील उपस्थित होते. काका जयंत पाटील यांच्याविरोधात ठाकरेसेना कट रचत असल्याचा आरोप निनाद पाटील यांनी केला. त्यामुळे मतदानापूर्वी महाविकास आघाडीत संघर्ष पेटला. ‘मुंबई तक’नं सुत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
MLC Election 2024: नार्वेकर जिंकले, पण ठाकरे व्हिलन ठरले; पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करुन शिंदेंनी काय काय साधले?
विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल उमेदवार मिलिंद नार्वेकरांच्या विरोधात गेल्यास महाविकास आघाडी सोडू, अशी धमकी ठाकरेंकडून देण्यात आली. विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान होण्यापूर्वी शरद पवारांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्यासाठी अनेकदा फोन केले. पण ठाकरेंनी त्यांच्या फोनला उत्तर दिलं नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.
MLC Election 2024: शरद पवारांचा डाव उलटवला, दादांचा उमेदवार वाचवला; निवडून आले नार्वेकर, शिंदे ठरले गेमचेंजर
ठाकरेसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांना पहिल्या पसंतीची २२ मतं मिळाली. त्यात काँग्रेसच्या ७ मतांचा समावेश आहे. या ७ मतांसाठी ठाकरेंना बराच संघर्ष करावा लागला. ठाकरेंना कोण कोण मतदान करणार, त्या आमदारांची यादी काँग्रेसनं ठाकरेंना दिली. त्यात मोहनराव हंबर्डे, सुलभा खोडके, कुणाल पाटील, शिरीष चौधरी या आमदारांच्या नावांचा समावेश होता. या आमदारांची मतं फुटतील आणि नार्वेकर पराभूत होतील, अशी भीती ठाकरेंनी होती.

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला अतिरिक्त मतं मिळाली आहेत. अजित पवारांच्या दुसऱ्या उमेदवाराला धोका असताना त्यांचा उमेदवार पहिल्या फेरीत जिंकून आला. दोन्ही उमेदवारांनी मिळून अधिकची ५ मतं घेतली. ही मतं काँग्रेस आमदारांची असल्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनीच पक्षाचे ३-४ आमदार क्रॉस व्होटिंग करतील अशी शक्यता बोलून दाखवली होती.