जेल की पक्षबदल, दोनच मार्ग होते, नियतीने ही वेळ कुणावर आणू नये, वायकरांची भावनांना मोकळी वाट

मुंबई : ‘चुकीच्या प्रकरणात मला गोवले गेल्यानंतर गजांआड जाणे, किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय माझ्यापुढे उरले… जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला. दबाव तर होताच, परंतु पत्नीचेही नाव गोवले गेल्यावर माझ्यापुढे पर्याय नव्हता… माझ्यावर नियतीने जी वेळ आणली, ती कोणावरही येऊ नये’, अशा शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे उत्तर-पश्चिम मुंबईचे उमेदवार व आताआतापर्यंतचे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिवसैनिक आमदार रवींद्र वायकर यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘मटा कट्टा’ उपक्रमांत त्यांनी प्रांजळ मत कथन केले.

अगदी अलिकडेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्या वायकर यांना सर्वांत उशिरा उत्तर-पश्चिम मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली. या प्रवासाविषयी त्यांनी आपल्या व्याकुळ भावनांना ‘मटा कट्टा’मध्ये वाट मोकळी करून दिली.

‘माझ्या हातातील शिवबंधन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेपासून आहे व खांद्यावरचे शिवधनुष्यही… बाळासाहेबांच्या शिवसेनेत ५० वर्षे राहिल्यानंतर मला उद्धव ठाकरे यांची साथ सोडावी लागली, तेव्हा एखाद्या कुटुंबसदस्याला आपण पारखे होतो, तशीच माझी भावना होती. परंतु नियतीने माझ्यासमोर यक्षप्रश्न निर्माण करून ठेवला व नियतीच कसा बदल घडवून आणू शकते, ते सर्वांनीच पाहिले’, असे ते म्हणाले.

‘माझ्याबाबतीत झालेली तक्रार फौजदारी स्वरूपाची नव्हतीच, मला सर्वोच्च न्यायालयापर्यंत दरवाजे ठोठावावे लागले. माझे प्रकरण राजकीयच आहे, असे वकिलांनीही मला सांगितले. कुणीच मला काही हमी देत नव्हते. साहजिकच माझ्यापुढे काही पर्याय नव्हते’, असे वायकर यांनी नमूद केले.
ठाकरे गटाला आणखी एक धक्का; ३४ वर्ष आमदारकी, बाळासाहेबांनी मंत्री केलेल्या नेत्याने साथ सोडली
‘गेली ३५ वर्षे आधी नगरसेवक व त्यानंतर १५ वर्षे आमदार या नात्याने केलेले काम जनतेसमोर आहे. हे काम मी महापालिकेचा स्थायी समिती अध्यक्ष असल्यापासून ते राज्यात मंत्री असेपर्यंत कायम केले आहे. मी ३६५ दिवस केवळ काम करीत असतो. आजचा मतदार हा हुशार व जागरूक आहे. तो काम बघतो. त्यामुळे माझ्या कामाच्या विश्वासावर निवडणूक लढवत आहे. मतदार हा उगाच विविध पक्षांचा पाठिंबा घेऊन लढणाऱ्याला जिंकून देत नाहीत’, असा विश्वासही रवींद्र वायकर यांनी व्यक्त केला.

‘मुंबई महानगरपालिकेचा स्थायी समिती अध्यक्ष असताना मुंबईच्या ठेवी ९० हजार कोटी रुपयांवर नेल्या. मुंबईसाठी ९०० दशलक्ष लिटर प्रतिदिन, इतके अतिरिक्त पाणी आणणारी योजना कार्यान्वित केली. राज्यात मंत्री असताना रेरासारखे अनेक विषय मार्गी लावले. मुळात मी राजकारण कधीच करत नाही. समाजकारण करतो. सातत्याने केवळ कामच करतो. त्यामुळेच या निवडणुकीत विरुद्ध असलेले अमोल किर्तीकर असोत, किंवा इतर निवडणूक, मला कधी आव्हान वाटलेलीच नाही. काम करणारा उमेदवार असताना तो चिन्हविरहित निवडणुकीतही जिंकतोच’, असे ते म्हणाले.
औरंगजेब फॅन्स क्लबचे मेंबर, राऊतांचा प्रश्न; उद्धव हसत म्हणाले… ‘सामना’च्या मुलाखतीचा टीझर
‘मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात किनारपट्टी नियमन व कोळीवाडा विकासासह अनेक समस्या आहेत. ‘केंद्रात सगळे हुशार बसलेले असतात. त्यामुळे तेथे निवडून जाणारा खासदारही अभ्यासू असावा. केवळ पक्षाचे चिन्ह घेऊन निवडणूक लढविणारा नको. मी सातत्याने प्रत्येक विषय केवळ अभ्यासाने मांडत तडीस नेला आहे. त्यानुसारच या मतदारसंघातही वेसावे कोळीवाडा, वन व पर्यावरण विभागाची कामे, विमानतळाचा फनेल झोन, जोगेश्वरी गुंफाचा विकास ही केंद्राच्या अखत्यारितील कामे असून तो विषय अभ्यास करून तिथे मांडणार आहे. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र धोरणाची गरज असेल व ती कशी, हेदेखील तेथे मांडले जाईल. मुंबई व महाराष्ट्र केंद्रात मांडला जाईल’, असे त्यांनी नमूद केले. ‘भाजप नेते किरीट सोमय्यांना मी प्रचारासाठी बोलवलेले नाही. मात्र अलिकडेच पक्षात आलेल्या संजय निरूपम यांचे सहकार्य मिळत आहे व मी ते घेतही आहे. तसेच जोगेश्वरीबाहेर भाजपचे पूर्ण सहकार्य मिळत आहे. त्याचवेळी राज ठाकरेंसह दिल्लीच्या काही नेत्यांच्या सभेची मागणी करण्यात आली आहे’, असेही त्यांनी सांगितले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

‘आरेचा विरोध मावळला’!

रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात असताना आरे येथील कारशेडला कडाडून विरोध केला होता. मात्र त्यांचा हा विरोध मावळल्याचे दिसले. ‘कुठलीही झाडे तोडण्याला माझा विरोधच आहे. पण आता आरे येथे कारशेड तयार झाले आहे. त्यामुळे आता विरोध कशाला’, असे ते म्हणाले. शिवसेनेच्या ४० आमदारांना गद्दार म्हणून हिणवण्याचा प्रयत्न होता. मग तुमच्या उमेदवाराचे वडील आमच्या पक्षात आल्यानंतर त्यांना गद्दार म्हणत नाही. हा दुटप्पीपणा आहे, असे वायकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सुनावले.