‘जयंतराव अपमान सहन करू नका, अनेक जण संपर्कात, तुम्हीही या’ अजित पवार गटाची ऑफर

Sunil Tatkare offer to Jayant Patil : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वर्धापन दिन नुकताच साजरी करण्यात आला. यादरम्यान पक्षाचे प्रदेशध्यक्ष जयंत पाटीलांच्या एका सूचक विधानाने राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह असल्याचे तर्क वितर्क मांडले जात आहेत. रोहित पवार यांनी जळगाव रावेरच्या लोकसभा निकालावरुन पोस्ट करत पक्ष संघटनेवर टीका केली होती. यानंतरच वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटील थेट म्हणाले “माझी मुदत किती महिने राहिली, ते मोजत बसू नका, मी नोव्हेंबरमध्ये स्वत:च नमस्कार करणार आहे. माझ्याबद्दल काही तक्रार असेल तर उगाच ट्वीट करुन जाहीरपणे मांडू नका, कानात येवून सांगा, पक्ष कोणाच्या एकाच्या मालकीचा नाही,मात्र माझी चूक झाली असेल तर शरद पवार सांगतील ती शिक्षा भोगेन” असे विधान जयंत पाटीलांनी भरसभेत केले.जयंत पाटीलांच्या विधानानंतर पाटीलांचा रोख रोहित पवारांकडे आहे अशा अनुषंगाने चर्चा रंगू लागल्या.

यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशध्यक्ष सूरज चव्हाण यांनी टिप्पणी करत म्हटले आहे की, “मागील वर्धापनदिनी अजित पवारांनी पक्षाची जबाबदारी मागितली होती परंतु त्यांना दिली नाही पाटील स्वत:चा गट वाढवण्याला महत्त्व देतायत, एखादा नवीन चेहऱ्याला पक्षात संधी मिळावी, परंतु ते होताना दिसत नाही अनेक दिवसांपासुन संघटनेत काम करण्याची इच्छा असणारे रोहित पवार पण पुढच्या वर्धापनदिनापर्यंत कंटाळून अजित पवारांसारखाच निर्णय घेतील” असे भाकित चव्हाणांनी वर्तवले आहे.
Jayant Patil: रोहित पवारांचे पक्ष संघटनेकडे बोट, जयंत पाटलांनी पवारांसमोरच सुनावलं

आता चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी जयंत पाटील यांना खुली ऑफर दिली आहे. “अपमान होत असताना तिथे राहू नका, अजित पवारांसोबत या योग्य सन्मान होईल,” असं म्हणत जयंत पाटलांना अजित पवार गटात सामील होण्याची ऑफर देण्यात आली आहे. तर दुसरीकडे सुनील तटकरेंनी जयंत पाटीलांच्या विधानावरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर सडकून टीका केली आहे. “राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशध्याक्षांना लोकसभेच्या विजयानंतर पक्षाचे नेतृत्व शरद पवारांसमोर चार महिने द्या! विधानसभेनंतर राजीनामा देतो, असे सांगावे लागते तर त्यांचे विश्लेषण करायची मला गरज नाही, म्हणून काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरात दगड फेकू नये असे तटकरे म्हणाले. तसेच शरद पवार गटातील अनेकजण आमच्या संपर्कांत आहेत असा दावा तटकरेंनी केलाय.


अजित पवारांनी नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी राज्यसभेवर आपले तीन खासदार जाणार अशी ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली होती. उद्या सकाळी अजित पवार गट राष्ट्रवादीच्या राज्यसभेवर जाणाऱ्या तीन उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे. अशी माहिती सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्यांना थेट राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे, यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाचा समावेश असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे.