चांदणी चौक की चक्रव्यूह? पादचाऱ्यांसाठी पूल उभारणीकडे यंत्रणांचे दुर्लक्ष, टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू

प्रतिनिधी, पुणे : एनडीए चौकात (चांदणी चौक) बसमधून उतरल्यानंतर रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा भरधाव टेम्पोच्या धडकेत गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला असून, पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि इतर यंत्रणांनी पादचारी पूल उभारणीकडे आणखी दुर्लक्ष केल्यास निष्पाप जीवांना असाच बळी जात राहणार आहे. पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्याची जबाबदारी पुण्यातील यंत्रणा कधी तरी घेणार आहेत की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

येथील बहुमजली उड्डाणपूल प्रकल्पामुळे आधीच्या तुलनेत रस्ता रुंद झाला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना कसरत करावी लागत आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे विभागाच्या माध्यमातून एनडीए चौकात पादचारी पूल उभारण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाला पाठवला आहे. यामध्ये बावधन ते मुळशी रस्ता यांना जोडणाऱ्या पुलाची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही.

घटना नेमकी घडली कशी?

शरद शंकर कदम (वय, अंदाजे ४२, रा. सातारा) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ मेच्या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कदम मूळचे साताऱ्याचे असून, गेल्या तीन महिन्यांपासून पिपरी-चिंचवड परिसरात राहायला होते. घटनेच्या दिवशी कदम हे चांदणी चौकातील बस थांब्यावरून कोथरूडच्या दिशेने रस्ता ओलांडत होते. त्या वेळ‌ी टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात कदम यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पोचालक मदत न करता पळून गेला.

पादचारी धोक्यात

एनडीए चौकातील उड्डाणपूल प्रकल्पाचे १२ ऑगस्टला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या प्रकल्पाच्या मूळ प्रस्तावात पादचारी पुलाचा समावेश नव्हता. त्यामुळे पाषाण-बावधन-कोथरूडकडून मुंबईकडे आणि मुळशीकडून सातारा व पाषाण-कोथरूडकडे जाण्यासाठी नागरिकांना धोकादायक पद्धतीने महामार्ग ओलांडून जावे लागते.

बावधन ते मुळशीदरम्यान पादचारी पूल

‘बावधन ते मुळशी दरम्यान नवीन पादचारी पूल उभारण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाला पाठविला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर एनडीए चौकात नवीन पादचारी पूल उभारण्यात येईल,’ असे चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी सांगितले होते.

एनडीए चौकात चित्र काय?
– एनडीए चौकात मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या एसटी बससह खासगी बसचा थांबा आहे.
– मुळशीकडे जाणाऱ्यांसाठीदेखील येथून खासगी वाहने उपलब्ध असतात.
– त्यामुळे विविध भागांतून नागरिक या ठिकाणी येत असतात; परिणामी, पायी येणाऱ्यांची संख्या अधिक.
– नागरिक धोकादायक परिस्थितीत रस्ता ओलांडतात.
– एनडीए चौकात पूर्वीच्या तुलनेत रस्ता दुपटीहून अधिक रुंद झाला आहे.
– या ठिकाणी पूर्वी सेवा रस्ता नव्हता; तसेच महामार्गाच्याही केवळ दोन मार्गिका होत्या.
– आता सेवा रस्ता आणि महामार्गाच्या तिसऱ्या मार्गिकेमुळे रस्ता रुंद.
– कोंडीमुक्त रस्त्यावर वाहनांचा वेगही वाढला आहे.

मटा भूमिका

गेल्या शनिवारी मध्यरात्री कल्याणीनगर येथे भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील अभियंता तरुण आणि तरुणीचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलिस, महापालिका, उत्पादन शुल्क आदी यंत्रणांच्या कारवाईला जोर आला. काही पबला टाळे लागले, तर काही जमीनदोस्त करण्यात आले. दोन जिवांचा बळी गेल्यानंतर यंत्रणांना जाग आली. एनडीए चौकात आता एका पादचाऱ्याचा जीव गेला आहे. या ठिकाणी पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पादचारी पूल उभारण्याची मागणी करून आणि प्रस्ताव पाठवून नऊ महिने उलटले आहेत. एका जिवाच्या बळीनंतर आता तरी संबंधित यंत्रणांनी जागे होऊन, पादचारी पुलाचा प्रश्न मार्गी लावावा.

तुमचे प्रश्न आम्हाला कळवा…

बहुमजली उड्डाणपुलाचा आराखडा करतानाच, यामध्ये पादचारी पुलाचा समावेश का झाला नाही, आराखडा करणाऱ्या सल्लागारावर कारवाई होणार का, पादचारी पुलाच्या प्रस्तावाचे घोंगडे अद्याप भिजत का पडले आहे, लाखो रुपयांच्या वाहनांसाठी उड्डाणपूल उभारले जात असताना सर्वसामान्यांच्या जीवाची किंमत कधी केली जाणार आहे का, असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात उमटले असतील, तर matapune@timesgroup.com यावर तुमची मते जरूर कळवा.

आचारसंहितेनंतर मान्यतेची शक्यता

‘चांदणी चौकातील उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. तिथे पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग अथवा पादचारी पूल उभारावा, असा प्रस्ताव प्राधिकरणाकडून पुढे पाठविण्यात आला होता. अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. महापालिकेने या चौकातील सुशोभीकरण व अन्य सुधारणांसंदर्भात पाठविलेल्या प्रस्तावाला आचारसंहितेनंतर मान्यता मिळण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.