काकांनंतर आता पुतण्याही भिजला, सातारच्या सभेची चाकणमध्ये पुनरावृत्ती; वारं फिरणार?

प्रतिनिधी, पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाच वर्षांपूर्वी पावसात सभा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाच अनुभव शनिवारी चाकण येथे घेतला. काकांप्रमाणे दादाही पावसात भिजले. या पावसाचा काकांना लाभ झाला तसा दादांना होणार का, हे मात्र चार जूनलाच समजणार आहे.शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चाकण येथे सभा आयोजित करण्यात आली होती. दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाचा फटका या सभेला बसला. अचानक पाऊस आल्याने सभेसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली; तसेच व्यासपीठावरील नेत्यांचीही पंचाईत झाली. अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उमेदवार आढळराव यांनी पावसात भिजण्याचा अनुभव घेतला. काही वेळाने पाऊस थांबल्यानंतर सभा सुरळीत पार पाडली. इतक्या पावसात महिला आणि पुरुष सभेसाठी थांबले म्हणून अजितदादांनी त्यांना सलाम ठोकला. ‘शिरूर लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चाकण, देहू, वाघोली, उरुळी कांचन, कात्रज-आंबेगाव बुद्रुक, सासवड या भागात मेट्रोचे जाळे विस्तारण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे,’ असे पवार यांनी सांगितले. दरम्यान, त्याआधी हडपसर विधानसभा मतदारसंघातील कोंढवा खुर्द परिसरात पावसात अजितदादांची रॅली पार पाडली.
उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, म्हणून त्यांनी..; फडणवीसांचा गौप्यस्फोट

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या २०१९च्या पोटनिवडणुकीत शरद पवार यांनी पावसात सभा घेतली होती. ‘राष्ट्रवादी’च्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपतर्फे ही निवडणूक लढवलेल्या उदयनराजे भोसले यांचा या सभेनंतर पराभव झाला. त्यामुळे पावसातली ही सभा चांगलीच चर्चेत आली. आजही या सभेची आठवण काढली जात असताना काकांप्रमाणे दादांनी पावसात सभा घेतल्याने आता निकाल काय लागणार, याकडे लक्ष लागले आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागच्या निवडणुकीचा खर्च मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी केला. कोल्हे यांना एक रुपया खर्च करू दिला नाही. मात्र, त्यांना मालिकांमुळे शेतकरी आणि आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ मिळाला नाही.

– अजित पवार, उपमुख्यमंत्री