काँग्रेसच्या बैठकीला ‘दांडी’, आमदार गोरंट्याल यांना मिठी, झिशान म्हणतात, काल आलो नाही कारण…

मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत १२ उमेदवार रिंगणात असल्याने एकाचा पराभव अटळ आहे. काँग्रेसचे नऊ आमदार फुटण्याची भीती वारंवार व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवासी झालेले नेते बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांनी काल काँग्रेसच्या बैठकीला अनुपस्थिती लावली होती. मात्र आज मतदान केल्यानंतर काँग्रेस आमदारांसोबत त्यांची थट्टामस्करी पाहायला मिळाली.

जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी झिशान सिद्दिकी यांना जवळ घेत फोटोसाठी पोझ दिली. मात्र मतदानापूर्वी झिशान यांनी आपल्याला काँग्रेसच्या बैठकीचं आमंत्रणच नसल्याने गैरहजर राहिल्याचा दावा केला.

झिशान सिद्दीकी यांची प्रतिक्रिया

मला त्यांनी बोलवलंच नव्हतं, मग मी कसा जाणार? मला त्यांनी का बोलवलं नाही, मला कोणत्याही बैठकीत सहभागी का करुन घेतलं जात नाही, याचं उत्तर तेच देऊ शकतात. मला कोणाचाही फोन, मेसेज किंवा ईमेल आला नव्हता. माझ्याबद्दल जे कोणी अफवा पसरवत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो, की मला काल बोलवलं असतं, तर मी नक्की गेलो असतो, असं झिशान म्हणाले.
Sushma Andhare : विधान परिषदेत अजितदादांचा उमेदवार पडणार? सुषमा अंधारेंनी थेट नावच सांगितलं
मी काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे. मी आजही काँग्रेस कार्यालयात जाणार आहे. तिथे जाऊन मी वरिष्ठांशी चर्चा करेन आणि ते मला ज्यांना मतदान करायला सांगतील त्यांना मी मत देईन, अशी प्रतिक्रिया झिशान सिद्दिकी यांनी मतदानापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती.

काँग्रेसचे चार आमदार गैरहजर

काँग्रेसच्या बैठकीला चौघं आमदार अनुपस्थित राहिले होते. त्यापैकी संजय जगताप आणि यशोमती ठाकूर यांची वरिष्ठांची परवानगी घेतली होती, तर अशोक चव्हाण समर्थक जितेश अंतापूरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नेते बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र झिशान सिद्दिकी गैरहजर राहिले होते.
Ganpat Gaikwad : गोळीबार फेम भाजप आमदार गणपत गायकवाडांना विधान परिषदेत मतदानापासून रोखा, काँग्रेस आक्रमक
दरम्यान, भाजपात प्रवेश केलेले राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या समर्थक आमदारांच्या मतांबाबतही काँग्रेसला शंका होती. त्यामुळे काँग्रेसने पहिल्या पसंतीचा मतांचा कोटा वाढवून २७ ते २८ इतका वाढवला. उर्वरित मतं ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने समर्थन दिलेले शेकाप नेते जयंत पाटील यांच्याकडे वळवण्याचं नियोजन करण्यात आलं होतं.