कच्ची दाबेली विकली, घरोघरी पेपर टाकणारा झाला आमदार, अमित गोरखे यांचा राजकीय प्रवास

प्रतिनिधी, पुणे (पिंपरी) : सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या, बिकट आर्थिक परिस्थिती लाभलेले आणि उदरनिर्वाहासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झालेले विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांची जीवनप्रवास वृत्तपत्र विक्रेता ते आमदार असा आहे. मातंग समाजाच्या इतिहासात विधान परिषदेवर जाणारे ते पहिले युवा आमदार ठरले आहेत.गोरखे कुटुंबीय मुळचे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदेजवळील लोणी व्यंकनाथ गावचे. वडील गणपत रखवालदाराच्या नोकरीनिमित्त मुंढवा येथे आले. १९८० मध्ये अमित यांचा जन्म झाला. त्यानंतर दोनच वर्षांत वडिलांना चिंचवड येथील रस्टन कंपनीत रखवालदार म्हणून रुजू व्हावे लागले. परिस्थिती बेताची असल्यामुळे एका पत्र्याच्या घरात राहण्याची वेळ आली. दहावीपर्यंतचे शिक्षण महापालिकेच्या शाळेत घेतलेल्या अमित यांनी आई अनुराधा यांच्या इच्छेखातर पुढील शिक्षणासाठी पुण्यात धाव घेतली.
MLC Election 2024: राईट हँडसाठी ठाकरेंची मिटिंग अन् गेम फिरला, नार्वेकर विजयी; ‘त्या’ बैठकीची इनसाईड स्टोरी

कला शाखेची पदवी घेतली. एम. ए. व एम. बी. ए. केले. या कालावधीत गोरखे कुटुंबीय काळभोरनगर येथील चाळीमध्ये वास्तव्यास आले. वडील गणपत यांनी येथेच एका सदनिकेसाठी बुकिंग केले. त्यासाठी मित्र, नातेवाइक यांच्याकडून कर्ज घेतले. कर्जाचे हप्ते आणि संसार चालविणे जिकरिचे झाल्यामुळे गणपतराव अचानक घर सोडून निघून गेले.

तीन मुले, त्यांचे शिक्षण आणि पैशांसाठी नातेवाईकांचा तगादा अशा परिस्थितीत आई अनुराधा यांनी जिद्द न सोडता शिक्षिकेची नोकरी करून परिस्थिती सांभाळली. या दिवसांत अमित यांनी कच्छी दाबेली विकली. घरोघरी वृत्तपत्रे टाकली. एसटी स्थानकावर जाऊन काकडी, गोळ्या बिस्किटे, शेंगदाणे विकण्याचे काम केले. एका कंपनीत हेल्पर म्हणूनही काम केले.

आईने रुजविलेले संस्कार जोपासून अमित यांनी २००३ मध्ये दोन गाळे भाड्याने घेऊन संगणक प्रशिक्षण केंद्र चालू केले. नॉव्हेल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च संस्थेची स्थापना केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षात महत्त्वाची पदे भूषविली.

नोकरी-व्यवसायानिमित्त उद्योगनगरीत स्थायिक झाल्यानंतर जीवनाचा प्रवास खडतर राहिला. मात्र, आई-वडिलांची शिकवण उपयोगी पडली. त्यांनी संस्काराची शिदोरी दिली. त्या बळावर वेळोवेळी यशाचे टप्पे गाठले आणि या निवडणुकीतही यश मिळवू शकलो.

– अमित गोरखे (आमदार, विधान परिषद)