एक फादर्स डे असाही! आजारी वडिलांना लेकीनं दिले जीवदान, वयाच्या २१व्या वर्षी यकृत दान

मुंबई : आज जागतिक फादर्स डे दिनानिमित्त अनेक मुली वडिलांना विविध भेटवस्तू देऊन आपली कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करतील. मात्र श्रुती परदेशी या २१ वर्षीय मुलीने आपल्या वडिलांना यकृतामधील काही भाग देऊन त्यांना जीवनदान दिले आहे. मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालयामध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली. डिपार्टमेंट ऑफ लिव्‍हर ट्रान्‍सप्‍लाण्‍ट अँड एचपीबी सर्जरीचे संचालक डॉ. गौरव गुप्‍ता आणि त्यांच्या वैद्यकीय चमूने यशस्वीरित्या ही शस्त्रक्रिया पार पाडली.

नाशिकमधील जितेंद्र परदेशी (४५) यांना तीन वर्षांपासून यकृताशी संबंधित आजार होता. त्यांना मूत्रपिंडासंबंधी विकारही होता. मागील वर्षी त्यांची प्रकृती अधिक खालावली. कावीळ, रक्ताच्या उलट्या, तसेच रक्त पातळ झाल्यामुळे स्ट्रोकही आला. कुटुंबीयांना त्यांची अशी अवस्था पाहवत नव्हती. वडिलांना लवकर बरे करण्याचा निर्धार श्रुतीने केला. यकृतदान केल्यानंतर, त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल, हा वैद्यकीय सल्ला मिळाल्यानंतर तिने स्‍वेच्‍छेने तिचे यकृत दान करण्‍याचे ठरवले. मात्र शस्‍त्रक्रियेपूर्वी तपासणी करताना, तिची शरीररचना वेगळी असल्‍याचे निदर्शनास आले. सामान्‍यत: यकृताच्‍या उजव्‍या व डाव्‍या बाजूंना होणारा रक्‍तपुरवठा वेगवेगळा असतो. श्रुती हिच्या बाबतीत यकृताच्‍या डाव्‍या बाजूला उजव्‍या बाजूकडील रक्‍तवाहिन्‍यांमधून अंशत: रक्‍तपुरवठा होत होता. प्रत्‍यारोपणासाठी तिच्‍या यकृताच्‍या उजव्‍या बाजूचा उपयोग केल्‍यास यकृताच्‍या डाव्‍या बाजूवर परिणाम होण्याची भीती होती. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्‍टरांनी प्रत्‍यारोपणासाठी तिच्‍या यकृताच्‍या उजव्‍या बाजूचा केवळ अर्धा भाग वापरण्‍याचे ठरवले.

‘श्रुतीची शरीररचना वेगळी असल्यामुळे ‘राइट पोस्‍टेरिअर सेगमेंट ग्राफ्ट’ ही क्वचित करण्यात येणारी प्रक्रिया करावी लागली. या प्रकारच्‍या दात्‍याच्‍या शस्‍त्रक्रियेमध्‍ये यकृताच्‍या उजव्‍या बाजूचा भाग घेण्याऐवजी आम्ही यकृताच्‍या उजव्‍या बाजूचा अर्धा भाग घेतला. त्यामुळे ही शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती. यकृत स्वीकारणाऱ्या रुग्णाला लहान आकाराच्या यकृताला प्रतिसाद देण्यामध्ये अडचणी होत्या. त्यांना ५०० ते ६०० ग्रॅम वजनाच्या यकृताची गरज होती. यामध्ये रुग्णाला केवळ ३७० ग्रॅम वजनाचे यकृत देता आले. शस्‍त्रक्रियेनंतर रुग्‍ण आणि अवयवदाता नाशिकला परतले असून दोघांची प्रकृती उत्तम आहे,’ असे डॉ. गौरव गुप्‍ता यांनी सांगितले.
सावधान! ‘फॅटी लिव्हर’ने वाढतोय ह्रदयविकाराचा धोका; रुग्णसंख्येत वाढ, जाणून घ्या कारणे, लक्षणे, उपाय…
‘वडिलांची प्रकृती सुधारल्याचा आनंद’

‘बाबांना वारंवार आजारी पडताना पाहून खूप वाईट वाटायचे. त्यांना कायमस्‍वरूपी उपचारांची गरज आहे, याची कल्पना होती. ज्यावेळी प्रत्यारोपणाविषयी सांगण्यात आले, त्यावेळी त्वरित यकृताचा काही भाग देण्याचे ठरवले. शस्‍त्रक्रिया झाल्‍यापासून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे. या नव्या पद्धतीच्या लिव्‍हर अॅनोटॉमीसाठी उपाय शोधून काढल्यामुळे वडिलांना जीवनदान मिळाले आहे,’ अशी भावना श्रुती हिने व्यक्त केली.