‘इनामदारी’तून स्डॅंडअप म्युझिकलची पर्वणी! अंबरनाथमध्ये कौशल्य इनामदार उलगडणार गाण्याची गोष्ट

मुंबई : पावसाचे तुषार अलगद अंगावर येतात आणि आपोआप ओठी एखादं पावसाचं गाणं आपण गुणगुणू लागतो…कवीला इतके चपखल कसे शब्द सुचतात आणि त्या शब्दांना आपल्या ओठी रुळणारी चाल संगीतकार कशी देतात, हे आपल्यासाठी नेहमी कुतूहलच! तेच उलगडण्याचे काम गायक व संगीतकार कौशल इनामदार आपल्या ‘इनामदारी’ या अनोख्या बहारदार मैफलीतून करतात. कविता आणि गाण्यांच्या गप्पांशी गुंफली गेलेली ही स्टँडअप म्युझिकल स्वरूपाची ‘इनामदारी’ आता अंबरनाथकरांच्या भेटीला येत आहे….‘मटा कॅलिडोस्कोप’च्या अंतर्गत. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त अंबरनाथमध्ये शनिवार, ८ जून रोजी सायं. ५.३० वा. अंबरनाथ नगरपालिका संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या सहकार्याने रोटरी क्लब सभागृहात ही मैफल रंगणार आहे.

प्रत्येक मराठी माणसाच्या ओठांवर रूळलेल्या मराठी अभिमानगीताची चाल कौशल इनामदार यांनी दिली आहे. त्यांनी ‘नॉट ऑन्ली मिसेस राऊत’, ‘बालगंधर्व’, ‘अजिंठा’, ‘येलो’, ‘पितृऋण’, ‘रंगापतंगा’, ‘उबुंटू’ यासारख्या अनेक मराठी चित्रपटांमधील गाण्यांना संगीत दिले आहे. त्यांच्या संपूर्ण सांगीतिक प्रवासाचा धांडोळा ते ‘इनामदारी’मधून घेतात. गप्पांमधून गोष्टी आणि गोष्टींतून गाणी उलगडणारा असा हा रंजक कार्यक्रम असेल. या कार्यक्रमात कौशल यांना अमेय ठाकूर-देसाई (तालवाद्य), सोमेश नार्वेकर (की-बोर्ड व व्होकल्स) आणि चैतन्य गाडगीळ (गिटार) हे साथसंगत करतील. हा कार्यक्रम विनामूल्य असून ८ जूनची संध्याकाळ ‘इनामदारी’ या कार्यक्रमासाठी राखून ठेवा!

कधी? शनिवार, ८ जून
वेळ? संध्या. ५.३० वा.
कुठे? रोटरी क्लब सभागृह, वडवली, अंबरनाथ (पू.)