आरोपीला सज्ञान घोषित करायचे की नाही, निर्णय घ्यायला १ ते ३ महिने लागणार, सुनावणीत काय घडलं?

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात कारचालक अल्पवयीन मुलाला दिलेला जामीन रद्द करत त्याला चौदा दिवस बाल निरीक्षण गृहात ठेवण्याचे आदेश बाल न्याय मंडळाने बुधवारी दिले. त्यामुळे तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यासह इतर अटी शर्तींवर जामिनावर बाहेर असलेल्या या अल्पवयीन मुलाला पाच जूनपर्यंत निरीक्षण गृहात राहावे लागणार आहे. मंडळाच्या प्रधान न्यायाधीश एम. पी. परदेशी यांनी हा आदेश दिला. त्याचवेळी आरोपीला सज्ञान घोषित करून खटला चालवावा यासंदर्भातील युक्तिवादही सरकारी वकिलांकडून करण्यात आला. मात्र याचा निर्णय घ्यायला किमान १ महिना ते ३ महिन्याचा कालावधी लागू शकतो, असे बाल न्याय मंडळाने सुनावणीअखेर स्पष्ट केले.

अपघातामधील आरोपी अल्पवयीन आहे. मात्र, हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीला सज्ञान म्हणून कारवाई करण्यास परवानगी मिळावी, असा अर्ज बाल न्याय मंडळाकडे करण्यात आला होता होता. यावर बाल न्याय मंडळासमोर सरकारी पक्षाकडून युक्तिवादही करण्यात आला. मात्र बाल न्याय मंडळाने अशा प्रकरणातील कायद्यातील तरतुदी अधोरेखित केल्या.
Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द, बाल न्याय मंडळाचा निर्णय

आजच्या सुनावणीत काय झाले?

जुवेनाईल जस्टीस अॅक्ट (मुलांचे संगोपन व संरक्षण) कलम १४ आणि १५ नुसार आरोपीला सज्ञान घोषित करायचे की नाही हे ठरविण्यासाठी १ महिना ते ३ महिने लागू शकतात. या दोन कलमात पोलिसांच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी बाल न्याय मंडळाकडे आहे. त्या आधी पोलिसांना अपघाताचा तपास पूर्ण करून एक महिन्यात आरोपपत्र दाखल करावे लागणार आहे. तसेच बाल सुधारगृहाच्या अधिकाऱ्यांचा रिपोर्ट लागणार आहे. त्याचबरोबर शासकीय मानसोपचारतज्ञ आणि समुपदेशकाचा अहवाल देखील लागणार आहे. या चार गोष्टींची पूर्तता करून अल्पवयीन मुलाला सज्ञान घोषित करायचे का नाही याचा निर्णय बाल न्याय मंडळ निर्णय घेईल, असे आजच्या सुनावणीत बाल न्याय मंडळाने स्पष्ट केले.

मागील सुनावनीत काय झाले होते?

आरोपी अल्पवयीन आहे. मात्र, हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीला सज्ञान म्हणून कारवाई करण्यास परवानगी मिळावी, असा अर्ज बाल न्याय मंडळाकडे करण्यात आला होता होता. मात्र, बाल न्याय मंडळाने तो अर्ज फेटाळला; तसेच अल्पवयीन आरोपीला १४ दिवस निरीक्षणगृहात ठेवण्याची मागणी केली होती. तीदेखील फेटाळण्यात आली. त्यानंतर आरोपीवर सज्ञान म्हणून गुन्हा चालविण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.