आईस्क्रिममध्ये सापडलेलं बोट कुणाचं? अखेर गूढ उलगडलं, डीएनए टेस्टमुळे पोलखोल

प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील मालाड येथे आइस्क्रीममध्ये सापडलेला मांसाचा तुकडा आइस्क्रीम तयार करणाऱ्या कंपनीतील कामगाराचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कामगाराचा डीएनए तुकड्यासोबत जुळल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

आइस्क्रीम खात असताना तोंडात मांसाचा तुकडा

मालाड परिसरात राहणाऱ्या एका डॉक्टरने एका अॅपवरून बेसन, आइस्क्रीम आणि काही चीजवस्तू मागविल्या. डिलिव्हरी बॉयने या वस्तू डॉक्टरकडे घरपोच केल्या. जेवण झाल्यावर आइस्क्रीम खात असताना डॉक्टरच्या तोंडात मांसाचा तुकडा आला. त्याने तो तुकडा बाहेर काढला आणि पाहिले त्यावेळी नख असलेला मांसाचा तुकडा असल्याचे दिसले. डॉक्टरच्या तक्रारीवरून त्याने मालाड पोलिस ठाण्यात आइस्क्रीम कंपनीविरुद्ध भादंवि कलम २७२ ( खाद्यपदार्थ भेसळ ) आणि ३३६ (मानवी जीव धोक्यात घालणारे कृत्य) यानुसार गुन्हा दाखल केला.
ड्रायव्हरचा लागला डोळा, भक्तांच्या बसवर काळाचा घाला; भीषण अपघातात तेरा जणांचा जागीच मृत्यू

पुणे येथील फॅक्टरीमध्ये जाऊन चौकशी

मालाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र अडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने पुणे येथील फॅक्टरीमध्ये जाऊन चौकशी केली असता, महिनाभरापूर्वी एक दुर्घटना घडली होती, त्यामध्ये एका कामगाराचे बोट कापले गेले होते, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी या कामगाराचे नमुने डीएनए चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले. कामगाराचे डीएनए नमुने मांसाच्या तुकड्यासोबत जुळले असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

आइस्क्रीमच्या उत्पादकांचे परवाने रद्द

त्या आइस्क्रीमच्या उत्पादकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, तसेच वर्षभर आइस्क्रीम गुणवत्तेच्या चाचण्या करण्यात येतील, असे एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी ‘मटा’ला सांगितले.