अल्पवयीन आरोपीसह दोन वर्गमित्रांच्या ब्लड टेस्टमध्येही फेरफार, नवी माहिती समोर

पुणे: पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याच्या फेरफार प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. याप्रकणात ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांसह तिघांना अटक करण्यात आली होती. आता अल्पवयीन आरोपीच्या आईलाही ताब्यात घेतलं आहे. आता या प्रकणात नवी माहिती समोर आली आहे. १९ मे रोजी ससूनमध्ये रक्ताचे नमुने घेऊन फेरफार करण्यात आले, यावेळी फक्त अल्पवयीन आरोपीच नाही तर आणखी दोघा अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते.

सूत्रांनुसार, दोन इतर अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले होते जे कोझी आणि ब्लॅक बारमध्ये पार्टीसाठी गेले होते. तसेच, अपघातावेळी हे दोघेही अल्पवयीन आरोपीसह कारमध्ये होते. त्यांचेही रक्ताचे नमुने घेण्यात आले होते आणि अल्पवयीन आरोपीप्रमाणे त्यांच्या रक्ताचे नमुने फेकून देऊन ते देखील बदलण्यात आले आहेत.
Pune Porsche Accident: पोर्शे प्रकरण दाबायचा प्रयत्न नाही, आरोप बिनबुडाचे, अजितदादा टिंगरेंच्या पाठीशी ठाम
“त्या दिवशी आणखी तीन व्यक्ती ससून रुग्णालयात होते. तीन अल्पवयीन मुलांचे तीन नातेवाईक ससूनला आले होते. अल्पवयीन मुलांचे रक्ताचे नमुने घेऊन ते कचऱ्यात टाकून देण्यात आले. आरोपी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने एका महिलेच्या नमुन्यासोबत बदलले गेले. इतर दोघांचे इतर दोन व्यक्तींच्या रक्ताच्या नमुन्यांसह बदलण्यात आले,” असे राज्य सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना त्याच्या आईच्या रक्ताशी बदलला गेला. तर इतर दोन अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुने त्यांच्या नातेवाईकांसोबत बदलले गेले. एकाचे त्याच्या वडिलांसोबत तर दुसऱ्याचा भावासोबत बदलला गेला.

पुणे पोलिसांनी कारमध्ये आरोपी अल्पवयीन मुलासोबत असलेल्या आणि त्याच्याच शाळेतील दोन अल्पवयीन मुलांची ओळख उघड केलेली आहे. पण, त्यांच्यावर कोणत्याही चुकी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. हे तिघेही एकाच वर्गात शिकतात आणि संध्याकाळी त्यांच्या शाळेत फेअरवेल पार्टीला गेले होते. त्यानंतर त्यांनी पार्टीत न थांबण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे ते पार्टीतून निघाले, नंतर ते कल्याणीनगरमधील पबमध्ये पार्टी करत असल्याचे आढळून आलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलाने त्यादिवशी पोर्शे कार ही त्याच्या शाळेतही नेली होती. पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते ज्यात अल्पवयीन आरोपी ड्रायव्हरच्या सीटवरून कारमधून बाहेर पडताना दिसत आहे. आरोपीसोबत असलेले इतर दोघंही मोठ्या कुटुंबातील आहेत.

या तिघांनाही १९ मे रोजी सकाळी ११ वाजता ससून रुग्णालयात ब्लड टेस्टसाठी आणण्यात आलं असून त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते, त्यानंतर ते त्यांच्या कुटुंबीयांच्या रक्ताच्या नमुन्यांशी बदलण्यात आले.