अमोल कोल्हेंकडून देवदत्त निकमांचा भावी आमदार म्हणून उल्लेख, ठाकरे गटाचे पदाधिकारी संतापले, खासदारांना विचारला जाब

मंचर, पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात खासदर अमोल कोल्हे यांच्या जाहीर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमात भाषणादरम्यान डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांचा उल्लेख “भावी आमदार” असा केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली आहे. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अमोल कोल्हे यांना जाब विचारला.
नामधारी अखेर माघारी! किशोर दराडे आणि संदीप गुळवे यांच्यासह चार उमेदवारांची नाशिक शिक्षक मतदारसंघातून माघार
शिरूर लोकसभा निवडणुकीत घावघवीत यश मिळाल्याबद्दल मंचर येथे डॉ. अमोल कोल्हे यांच्या जाहीर सत्कारचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हे यांची जाहीर मिरवणूक देखील यावेळी काढण्यात आली. मिरवणुकीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात कोल्हे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना भाषणाच्या वेळी कोल्हे यांनी भाषणात देवदत्त निकम यांचा भावी आमदार असा उल्लेख केला. त्यामुळे ठाकरे गटाचे पदाधिकारी व्यासपीठ सोडून खाली आले आणि घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्मण झाली होती.

जिल्हाप्रमुख सुरेश भोर म्हणाले की, आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांना ९३ हजार मते पडली आहेत. त्यातील तब्बल ६० हजार मते ठाकरे गटाची आहेत. इतर पक्षांची मिळून केवळ ३० हजार मते आहेत. अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांचा भावी आमदार असा जो उल्लेख केला आहे, त्याला आमचा आक्षेप असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हे यांनी आताच जाहीर केलली उमेदवारी आम्हाला पटलेली नाही. त्यांचा भावी आमदार म्हणून केलेला उल्लेख आम्हाला मान्य नसल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. यावर खासदार अमोल कोल्हे यांनी मी निकम यांची उमेदवारी जाहीर केली नाही महाविकास आघाडीचे नेते जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल असे स्पष्टीकरण कोल्हे यांनी दिले. माझ्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे अमोल कोल्हे म्हणाले. या प्रकारामुळे काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.