अजितदादांच्या मनात नेमके काय? मंत्र्यांच्या लवाजमा घेऊन बारामतीत १४ जुलैला धमाका करणार

बारामती (दीपक पडकर ) : बारामतीत येत्या १४ जुलै रोजी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जनसन्मान मेळावा घेणार आहे. त्यासाठी अगदी २५ हजार कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक व्यवस्था केली जाणार आहे. बारामतीच्या मिशन हायस्कूल मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेपूर्वीच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी या सभेत मोठा धमाका होणार, असे सांगून सभेला हवा दिली आहे. लोकसभेत निराशाजनक कामगिरी केलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून असा नेमका काय धमाका होणार याची मात्र यानिमित्ताने उत्सुकता शिगेला पोचली आहे.

महायुतीत प्रवेश केल्यानंतर अजितदादांनी बारामती लोकसभेच्या निवडणूकीतही असाच धमाका केला आणि सुनेत्रा पवारांना बारामतीतून उमेदवारी दिली. शेवटपर्यंत कार्यकर्ते व गावोगावचे ज्येष्ठ नागरिक अजितदादा सुनेत्रा पवारांऐवजी दुसरा उमेदवार देतील अशा अपेक्षेत होते. मात्र दादांनी साऱ्यांची गणिते पलटी करीत मोठे धाडस केले. सहानुभूतीच्या चक्रव्यूहात मात्र दादांचा दारूण पराभव झाला. त्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढे काय असा प्रश्नही निर्माण झाला, मात्र तेवढ्यात लाडक्या बहिणीने पुन्हा अजितदादांच्या पक्षाची प्रतिमा जनमानसात रुजू लागली.

आता १४ जुलै रोजी अजितदादा विधानसभेचे रणशिंग फुंकणार का? पक्ष महायुतीतूनच लढणार की एकला चलोचा मार्ग अवलंबणार? महायुतीतील धुसफूशीवर काय बोलणार का? राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबद्दल दादा काय बोलणार, असे एक ना अनेक प्रश्न व शंका सध्या बारामतीकरांच्याही मनात आहेत आणि राष्ट्रवादीच्या अजितदादांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहेत.

त्या पार्श्वभूमीवर नेमके या मेळाव्यात दादा काय बोलणार? याची उत्सुकता आहेच, मात्र राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे निर्णय या मेळाव्यात दादा घेतील का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोकसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतून बाहेर पडण्याचा धोका अजितदादा स्विकारणार नाहीत अशा स्थितीत भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने केल्या जात असलेल्या टिप्पणीवर ते काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे.

एकूणच लोकसभेच्या निवडणूकीपासून बारामतीकडे न आलेले दादा दोन दिवसांपूर्वी पालखी सोहळ्यात सहभागी झाले, तब्बल सात ते आठ किलोमीटर पायी चालले आणि त्यानंतर पहिल्यांदाच ते जाहीर सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत आहेत, राज्यसभेवर निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारही पहिल्यांदाच मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत, त्या सर्व पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्वाचा ठरेल असे दिसत आहे.