अजितदादांची सभा, भुजबळांचं आरक्षणावर भाषण आणि समोरून कार्यकर्त्यांच्या ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा

दीपक पडकर, बारामती: बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने जनसन्मान मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांचे ही भाषण झाले. या भाषणात छगन भुजबळ यांनी आवर्जून आरक्षणाचा विषय काढला. या आरक्षणाच्या विषयात छगन भुजबळ यांना शरद पवार यांना लक्ष्य करायचे होते. त्यानुसार त्यांनी दोन दिवसापूर्वी सह्याद्री अतिथिगृहावर घडलेल्या आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीचा मुद्दा सांगितला.
पावसात भिजत भिजत अजितदादांचे विरोधकांचे हल्ले, हौशे नवशे गौशे येतील, बाबांनो आता भुलू नका!
शरद पवारांवर निशाणा साधताना छगन भुजबळ म्हणाले की, या सर्वेक्षीय बैठकीला विरोधकांनाही बोलावले होते. मी स्वतःही विजय वडेट्टीवार तसेच जितेंद्र आव्हाड यांनाही सांगितले होते. तुम्ही या म्हणून तेव्हा जितेंद्र आवड यांच्याशी बोलताना शरद पवार यांनाही बोलवा असे सांगितले होते. कारण मंडल आयोगाच्या वेळी शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळे शरद पवारांचेही आभार त्यावेळी आम्ही मानले होते.आताही एक ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांना बोलावले होते. सारे जण येणार होते, परंतु अचानक बारामतीतून कोणाचा तरी फोन गेला आणि विरोधकांनी बहिष्कार टाकला, असे छगन भुजबळ म्हणाले. तोपर्यंत बाजूला असलेल्या राष्ट्रवादीच्या समर्थकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देण्यास सुरुवात केली. ही घोषणाबाजी वाढली आणि या घोषणाबाजीतच छगन भुजबळ यांचे भाषण संपले. यानंतर याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान आज राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या पक्षाच्या वतीने आज बारामतीतील मिशन हायस्कूल ग्राउंडवर जनसन्मान मेळावा पार पडला. या मेळाव्यात पावसाने मोठी हजेरी लावली. यावेळी अनेक नेत्यांची भाषणे खोळंबल्याचे दिसून आले. पाऊस कमी झाल्यावर अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला आहे. यावेळी महाराष्ट्र राजकारण आणि आरक्षण मुद्द्यावर भाष्य करण्यात आले आहे. अजित पवारांनी भर पावसात भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी डोक्यावर खुर्च्या घेतल्याचे पहायला मिळाले. तसेच कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या नावाचा जयघोष सुरू केला होता.