Zika Virus In Pune: झिका विषाणूच्या रुग्णांनी डोकेवर काढले; पुण्यात आढळले दोन रुग्ण, जाणून घ्या काय असतात लक्षणे

प्रतिनिधी, पुणे

वातावरणातील बदलामुळे शहरात सर्दी, ताप, खोकला आणि टायफॉइडच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता झिका विषाणूच्या रुग्णांनी डोकेवर काढले आहे. शहरातील एरंवडणे परिसरात राहणाऱ्या ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या १५ वर्षीय मुलीला झिका विषाणूचा संसर्ग झाला आहे. या दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये येरवडा परिसरातील एका ६४ वर्षीय महिलेला झिका विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यानंतर शहरात झिका विषाणूचा एकाही रुग्ण आढळून आला नव्हता. डॉक्टर असलेल्या ४६ वर्षीय रुग्णाला लक्षणे दिसल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात तपासणी केली. त्यानंतर १८ जूनला रक्ताचा नमुना राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आला. एनआयव्हीने २० जूनला तपासणी अहवाल दिला. या अहवालात झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्या मुलीला लक्षणे जा‌णवू लागल्याने तीच्या रक्ताचा नमुना २१ जूनला एनआयव्हीकडे पाठविण्यात आला. एनआयव्हीने २१ जूनलाच अहवाल देऊन रुग्णाला झिकाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट केले.
T20 World Cup 2024: अफगाणिस्तान संघाच्या ऐतिहासिक कामगिरीवर सचिन तेंडुलकर म्हणाला, तुमच्या प्रगतीचा अभिमान वाटतो

यानंतर महापलिका आरोग्य विभागाने या परिसरात सर्वेक्षण सुरू केले आहे. सर्वेक्षणात आढळून आलेल्या तापाच्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने संकलीत करण्यात आले आहे. मात्र, दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. तसेच दोन्ही रुग्णांनी परदेशात किंवा दुसऱ्या राज्यात प्रवास केलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन महापालिका आरोग्य विभागाने केले आहे. गेल्या आठवड्यात मंगळवार पेठेतील एका सोसायटीमध्ये टायफॉइडचे रुग्ण आढळून आले होते. या रुग्णांवर उपचार करण्यात आले असून आता टायफॉइड रुग्णांची संख्या कमी असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

लक्षणे
– ताप येणे.
– डोळे लाल होणे आणि सुजणे.
– डोकेदुखी.
-पाय आणि गुडघेदुखी.
– शरीरावर लाल चट्टे येणे.

‘रुग्ण आढळून आलेल्या परिसरात सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणात आढळून आलेल्या तापाच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यांचे
रक्ताचे नमुने संकलीत करण्यात आले आहे. डासोत्पतीची ठिकाणे नष्ट करण्यासाठी फवारणी करण्यात आली आहे. साथरोगांवर उपाययोजना करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत’ – डॉ. कल्पना बळीवंत, आरोग्य प्रमुख, महापालिका