फ्रिज आणि भिंतीमध्ये अंतर ठेवणे का गरजेचं आहे? हे वाचून तुम्ही आजच जागा बदलाल!

फ्रिज हा प्रत्येक घरातील अविभाज्य भाग झाला आहे. अनेकदा आपण त्याचा ब्रँड, डिझाइन, क्षमतेकडे लक्ष देतो; पण एक महत्त्वाचा मुद्दा अनेकदा दुर्लक्षित होतो तो म्हणजे, फ्रिज कुठे आणि कसा ठेवावा? अनेक घरांमध्ये जागेअभावी किंवा सौंदर्यदृष्टीने विचार करून फ्रिज थेट भिंतीला चिकटवून ठेवला जातो. पण ही छोटी वाटणारी चूक मोठ्या अडचणीला कारणीभूत ठरू शकते. मग चला, जाणून घेऊया हे अंतर का महत्त्वाचं आहे आणि ते किती असावं.

फ्रिज आणि भिंतीमध्ये जागा का गरजेची आहे?

तुम्ही जुन्या फ्रिजच्या मागे पाहिले असेल, तर तिथे जाळीसारख्या कॉईल्स असायच्या. या कॉईल्स फ्रिजमधील उष्णता बाहेर टाकण्याचं काम करायच्या. त्यामुळे फ्रिज आणि भिंतीमध्ये आपोआपच थोडी जागा राहायची, ज्यामुळे हवा खेळती राहायची आणि कॉईल्स थंड व्हायला मदत व्हायची.

आता नवीन फ्रिजचे डिझाइन बदलले आहे. अनेक फ्रिजमध्ये या कॉईल्स आतमध्ये लपवलेल्या असतात. त्यामुळे लोकांना वाटतं की आता फ्रिज भिंतीला अगदी चिटकवून ठेवला तरी चालेल. पण इथेच मोठी चूक होते! जरी कॉईल्स दिसत नसल्या, तरी फ्रिज चालताना उष्णता निर्माण होतेच आणि ती बाहेर पडण्यासाठी आणि हवा खेळती राहण्यासाठी जागेची गरज असतेच. जर फ्रिज भिंतीला पूर्णपणे चिकटलेला असेल, तर हवेला फिरायला जागा मिळत नाही आणि फ्रिजच्या मागील किंवा बाजूचा भाग गरजेपेक्षा जास्त गरम होऊ लागतो.

जागा न सोडल्यास काय धोके आहेत?

फ्रिजला योग्य हवा खेळती राहिली नाही, तर त्याचा कंप्रेसर अधिक वेळ चालू राहतो, वीजेचा वापर वाढतो आणि तुमचं वीजबिल जास्त येतं. याशिवाय, गरम भागांमुळे सिस्टममध्ये खराबी, वारंवार दुरुस्ती लागणे आणि कधी कधी अपघाताची शक्यता देखील वाढते. विशेषतः उन्हाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होऊ शकते.

नेमकं किती अंतर ठेवा?

  • तुमचा फ्रिज व्यवस्थित काम करण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी
  • फ्रिजचा मागचा भाग आणि भिंत यामध्ये किमान २ ते २.५ इंच अंतर ठेवा.
  • फक्त मागेच नाही, तर फ्रिजच्या दोन्ही बाजूलाही थोडी जागा मोकळी ठेवावी.
  • शक्य असल्यास, फ्रिज अशा ठिकाणी ठेवा जिथे थोडी हवा खेळती राहील, शक्यतो खिडकीजवळ.
(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)