बदलत्या वातावरणात हेल्दी राहण्यासाठी आपण पौष्टिक अन्नाचे सेवन करत असतो. तसेच आपल्या आहारात हंगामी भाज्या, फळे तसेच अनेक पदार्थांचा समावेश केल्याने आरोग्य तंदुरस्त राहते. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. हेल्दी राहण्यासाठी जीवनसत्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक खूप महत्वाचे आहेत. घरी बनवलेले हेल्दी आणि ताजे अन्न खाणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच हे अन्न बनवण्यासाठी वापरले जाणारे घटक आणि बनवण्याच्या पद्धतीवर देखील बरेच अवलंबून असते.
स्वयंपाक करताना अनेकांकडून नकळत काही चुका होतात. ज्या अन्नाच्या पौष्टिक मूल्यावर परिणाम करतात. त्यामुळे आपण कितीही खाल्ल तरी त्याचे पोषण आपल्याला शरीराला मिळत नाही. आज आम्ही तुम्हाला स्वयंपाक बनवताना होणाऱ्या काही चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे पदार्थांचे पौष्टिक मूल्य कमी होते. चला तर मग जाणून घेऊयात…
जास्त शिजवणे
रोजच्या आहारात भाजी प्रामुख्याने बनवली जाते. अशातच भाजी खाताना चविष्ट लागावी यासाठी आपण ती जास्त वेळ शिजवतो. पण भाजी जास्त वेळ शिजवल्याने किंवा तळल्याने त्यामध्ये असलेले जीवनसत्त्वे, खनिजे आणि एंजाइम यांसारखे पोषक घटक कमी होतात. म्हणून, भाज्या जास्त शिजवू नयेत. विशेषतः हिरव्या पालेभाज्या जास्त शिजवल्यास त्यांचे पोषक घटक खुप कमी होतात. अशाने तुम्ही हेल्दी राहण्यासाठी पालेभाज्यांचे सेवन करता पण याच भाज्या अधिक शिजवून खाल्ल्याने त्यांचा कोणताच फायदा आपल्या शरीरावर होत नाही.
मोठ्या आचेवर स्वयंपाक करणे
आपण कधी कधी लवकर जेवण बनावे यासाठी शेगडीच्या मोठ्या आचेवर स्वयंपाक करतो. पण तुम्हाला माहित आहे का जेव्हा मोठ्या आचेवर स्वयंपाक केल्याने काही पदार्थांमधील पोषक तत्वांची गुणवत्ता कमी होऊ शकते. म्हणूनच तुम्ही नेहमी भाज्या मंद आचेवर शिजवाव्यात. स्वयंपाक करताना कमी आच वापरून जेवण बनवणे नेहमी चांगले, जेणेकरून पोषक तत्वे अबाधित राहतील.
तेलाचा जास्त वापर
असे अनेक लोकं आहेत जे जेवण बनवताना भरपुर तेलाचा वापर करतात. पण जास्त तेलकट पदार्थांचे सेवन आपल्या शरीरासाठी खूप हानीकारक असते. अशावेळेस जर स्वयंपाकासाठी जास्त तेल वापरले तर त्यामुळे पदार्थांमध्ये जास्त कॅलरीज तयार होऊ शकतात आणि अन्न देखील जास्त तेलकट बनते. जे आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणून, तेल मर्यादित आणि आरोग्यदायी पद्धतीने वापरावे.
जास्त पाण्यात स्वयंपाक करणे
अनेकदा स्वयंपाक बनवताना भाज्यांमध्ये जास्त पाणी वापरले जाते. जेणेकरून भाजी लवकर शिजावी. पण तुम्ही भाज्यांमध्ये पाण्याचा सर्वाधिक वापर केल्याने त्यात असलेले पोषक घटक कमी होऊ शकतात. भाज्या उकळण्याऐवजी वाफवून घ्या. ज्या पाण्यात तुम्ही भाज्या उकळल्या त्या पाण्याचा सूप बनवून त्यांचे सेवन करा.
तेलाचा पुनर्वापर
बरेच लोक ज्या तेलात पुरी, भजी तळतात त्याच तेलाचा वापर इतर भाज्या बनवण्यासाठी अनेकदा केला जातो. त्यामुळे अन्नाच्या पौष्टिक मूल्यावरच परिणाम होत नाही तर तेलाचा पुनर्वापर आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरू शकतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)