‘तुम्ही महायुतीत येऊच नका’; आठवलेंचं राज्यातील या बड्या नेत्याला थेट आवाहन

मनसे महायुतीसोबत येणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यावर आता आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. महायुतीमध्ये आम्हाला आताच काही मिळत नाही, राज ठाकरे महायुतीत आल्यानंतर आम्हाला अजूनच काही मिळणार नाही, त्यामुळे मनसेने महायुतीमध्ये येऊ नये असं आठवले यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले आठवले? 

महायुतीत आम्हाला आताच काही मिळत नाही, राज ठाकरे महायुतीत आल्यानंतर आम्हाला अजूनच काही मिळणार नाही, त्यामुळे महायुतीत मनसेने येऊ नये असं आठवले यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की,  मनसे महायुती येईल अशी चर्चा सध्या सुरु आहे. राज ठाकरे आमचे चांगले मित्र आहेत. मात्र राज ठाकरे यांनी महायुतीत येऊ नये. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीनं मला डावलं, मात्र मी महायुतीला डावलं नाही. त्यांना ज्या प्रकारे आपल्या पक्षातील नेते आणि कार्यकर्ते सांभाळावे लागतात अगदी त्या प्रकारे मला देखील माझे कार्यकर्ते सांभाळावे लागतात, त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आम्हाला जागा देण्यात याव्यात, अशी मागणी आठवले यांनी यावेळी केली. ते  पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

‘लाडकी बहीण’वर प्रतिक्रिया   

विधानसभा निवडणुका पूर्वी लाडक्या बहिणीचे निकष हे शिथील होते, मात्र आता राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे कमी असल्याने त्यांनी लाडक्या बहिणीचे निकष कडक केले आहेत, असा घरचा आहेर देखील यावेळी आठवले यांनी सरकारला दिला आहे.

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर प्रतिक्रिया    

सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाई अतिशय संथगतीनं होत आहे.  सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात अजूनही दोषींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावं संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो, असंही यावेळी आठवले यांनी यावेळी म्हटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)