मुंबईसह राज्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २० मे रोजी मतदान होणार आहेत. यात अनेक बहुचर्चित मतदारसंघांचा समावेश असून, यातील मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघाकडे उभ्या देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात दोन्ही शिवसेना पक्षांचे उमेदवार आमने-सामने आहेत. इथे शिवसेना (उबाठ) पक्षाकडून अमोल कीर्तिकर, तर शिवसेनेकडून आमदार रवींद्र वायकर यांना संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना (उबाठा)पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जागावाटप अंतिम होण्यापूर्वीच अमोल यांना संधी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत होता. त्यातच अमोल यांना आलेली ‘ईडी’ची नोटीस आणि त्यानंतर रवींद्र वायकर यांची ‘ईडी’ने केलेली चौकशी, त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हा मतदारसंघ आणि त्यातील उमेदवार चर्चेत्या केंद्रस्थानी आहेत.
उत्तर पश्चिम मतदारसंघात १७ लाख ३५ हजार ०८८ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यातील जवळपास १५ ते १७ टक्के मतदार हे उत्तर भारतीय आहेत. त्यामुळेच त्यांना आकर्षित करण्यासाठी महायुती व विशेष करून भाजपने नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसारच योगी आदिनाथ यांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. या सभेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्याची तयारीही सुरू आहे. साधारण पुढच्या आठवड्यात याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
प्रचारफेऱ्यांची तयारी
या मतदारसंघात योगी आदिनाथ यांच्यासह भाजपच्या ‘स्टार प्रचारक’ यादीमध्ये समावेश असलेल्या इतर काही उत्तर भारतीय चेहऱ्यांच्या प्रचारफेऱ्या काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. त्याशिवाय शिवसेनेकडून अभिनेता गोविंदा यांना प्रचारासाठी मैदानात उतरविले जाणार असून, अन्य काही सिनेअभिनेत्यानांही आमंत्रित करण्याचा विचार सुरू असल्याचे कळते.