होय! राज ठाकरे-उद्धव ठाकरे येऊ शकतात एकत्र, ‘ही’ आहेत पाच कारणं!

MNS And Uddhav Thackeray Alliance : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अलिकडेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात एक बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर मुंबई तसेच इतर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता आमच्यातली भांडणं खूप छोटी आहेत. महाराष्ट्र मोठा आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती होऊ शकते, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) या भूमिकेचे ठाकरे गटानेही स्वागत केले आहे. आम्ही राज ठाकरेंच्या विधानाकडे सकारात्मकपणे पाहतोय, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. त्यानंतर आता ठाकरे गट आणि मनसे यांच्यात खरंच युती होऊ शकते का? असा प्रश्न विचारला जात आहे. या दोन्ही पक्षांत युती होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. त्यासाठीची पाच कारणं कोणती आहेत? ते जाणून घेऊ या…

1) राजकीय वर्चस्व आणि सत्तेची आस

राजकारण्यांना सत्ता नेहमीच प्रिय असते. सत्तेत येण्यासाठी ते नेहमीच वेगवेगळे प्रयत्न करताना दिसतात. गेल्या काही वर्षांत तर सत्ताकारणासाठी महाराष्ट्रात सर्वांनाच चकीत करून टाकणारे प्रयोग झाले आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे काँग्रेस-शिवसेना हे महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आलेले आहेत. तर दुसरीकडे कधीकाळी लाव रे तो व्हिडीओ म्हणत भाजपावर टीका करणारे राज ठाकरे यांनी पुन्हा महायुतीला पाठिंबा देताना आपण पाहिलंय. सत्तेत येण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेना पक्षाची दोन शकलं केली. अजित पवार यांनीदेखील राष्ट्रवादी पक्ष फोडला. त्यामुळे राजकारणात सत्तेचं गणित साधण्यासाठी कोणताही प्रयोग कधीही केला जाऊ शकतो. गेल्या काही वर्षांत वर उल्लेख केल्याप्रमाणे अनेक अनाकलनीय घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांचे राजकीय विरोधक असले तरी ते आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून एकत्र येऊ शकतात, तशी शक्यता नाकारण्याचे काही कारण नाही. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे गटानेदेखील राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागतच केले आहे. आम्ही या गोष्टीकडे सकारात्मक पद्धतीने बघतो, असं ठाकरे गटाने म्हटले आहे. त्यामुळे भविष्यात सत्तेपर्यंत पोहोचण्याचा एकमेव उद्देश समोर ठेवून मनसे आणि ठाकरे गट अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

2) बाळासाहेबांचा वारसा आणि ठाकरे घराणं

उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष हा नेहमीच आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊनच पुढेच चाललो आहोत, असे सांगत आलेला आहे. दुसरीकडे राज ठाकरे हेदेखील बाळासाहेब ठाकरे यांना पूज्यनीय मानतात. राज ठाकरे हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात बराच काळ बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होते. त्यामुळे त्यांनीदेखील बाळासाहेबांच्या विचारधारेवरच त्यांचा मनसे पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाळासाहेब ठाकरे आज हयात नसले तरी त्यांच्या नावाचा दबदबा आजही तेवढाच आहे. त्यांच्यामुळे ठाकरे या आडनाला मिळालेलं वाजन अजूनही कमी झालेलं नाही. हेच ठाकरे आडनाव राज आणि उद्धव यांच्यातील एक समान धागा आहे. ते दोघेही एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. त्यामुळे एकाच घराण्यातून येत असल्याने आणि दोन्ही पक्ष बाळासाहेबांचा विचार पुढे नेत असल्याने ते भविष्यात एकत्र येण्यास काहीही हरकत नसल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

3) मराठी अस्मिता

शिवसेना हा पक्ष मुळात मराठी अस्मिता समोर ठेवूनच मुंबई, उपनगर आणि नंतर महाराष्ट्रभर वाढलेला आहे. मुंबईत परप्रांतीयांचे वाढणारे प्रमाण आणि त्यातून मराठी माणसांची होणारी कुचंबना रोखण्यासाठी शिवसेनेने सुरुवातीच्या काळात मोठे काम केलेले आहे. आजही मुंबईचं मराठीपण टिकून राहावं यासाठी ठाकरेंची शिवसेना प्रयत्नशील असते. दुसरीकडे राज ठाकरे यांनी जेव्हापासून मनसे हा पक्ष स्थापन केलेला आहे. तेव्हापासून त्यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा उचलवून धरलेला आहे. मनसेचे आतापर्यंत मराठी माणसांना न्याय मिळावा म्हणून मुंबई, उपनगर तसेच महाराष्ट्रभर आंदोलन केलेले आहे. दुकानांवरील मराठी पाट्या, बँकेचे मराठी भाषेतील व्यवहार अशा मागण्या मनसेने मोट्या नेटाने लावून धरलेल्या आहेत. म्हणजेच मराठी अस्मिता हा मनसे आणि ठाकरे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांचा समान धागा आहे. आता लवकरच मुंबई पालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे हाच मराठी अस्मितेचा मुद्दा लक्षात घेऊन हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

4) हिंदुत्त्वाचा मुद्दा

मराठी अस्मितेसोबतच हिंदुत्त्वाचा मुद्दादेखील मनसे आणि ठाकरे गट यांच्यातील समान धागा आहे. शिवसेना पक्षाने सुरुवातीला मराठी माणसांना न्याय मिळावा हा उद्देश समोर ठेवून मुंबई, ठाणे तसेच उपनगरांत काम केले. मराठीचा मुद्दा समोर ठेवून या पक्षाने तेव्हा मोठे आंदोलन उभे केले होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा उचलून शिवसेना पक्षाचा संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार केला. बाळासाहेबांचा हाच विचार आता उद्धव ठाकरे पुढे घेऊन जाताना दिसतायत. आम्ही अजूनही हिंदुत्त्व सोडलेलं नाही, असे उद्धव ठाकरे ठणकावून सांगताना दिसतात. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनीदेखील सुरुवातीला मराठीचा मुद्दा घेऊन नंतर हिंदुत्त्वाला जवळ केलेलं आहे. मनसे आणि ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष हिंदुत्त्वाच्या विचारधारेला मान्य करणारे आहेत. त्यामुळेच या हिंदुत्त्वाच्या समान धाग्याला लक्षात घेता हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

5) नव्या समीकरणाची आस

राज्यात सुरुवातीला युती आणि आघाडीचं राजकारण होतं. शिवसेना आणि भाजपा यांच्याविरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे निवडणूक लढवायचे. त्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडी हे नवे समीकरण उदयास आले. राज्यात महायुतीने विकासकामं केली नाहीत, असा आरोप सातत्याने होते. तसेच महाविकास आघाडीनेही सत्तेत येऊन फारसा विकास केला नाही, राजकीय विरोधक म्हणतात. असे असताना आता मनसे आणि ठाकरे यांची युती भविष्यात सकारात्मक चित्र निर्माण करू शकेल. मनसे आणि ठाकरे एकत्र आलेच तर महापालिका आणि आगामी काळात होणाऱ्याा निवडणुकांत काहीतरी नवा निकाल येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाऊ शकते. म्हणजेच नव्या समीकरणामुळे राज्याच्या राजकारणात लोकांमध्ये नवी आस निर्माण होऊ शकते. मतदार स्थानिक स्वराज्य संस्था तसेच आगामी मोठ्या निवडणुकांतही या युतीला मतदान देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, मनसे आणि ठाकरे गट यांच्यात युती होणार का? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे. मात्र दोन्ही बाजूंनी दाखवण्यात आलेल्या साकारात्मकतेमुळे राज्याच्या राजकारणात काहीतरी नवं पाहण्याची आस लागलेल्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. त्यामुळे भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)