‘अपघातानंतर पळून जाताना कावेरी या बंपर आणि चाकाच्या मध्ये अडकल्याचे कळलेच नाही. एक ते दीड किलोमीटरवर गेल्यानंतर चाक अडखळत असल्याने बाहेर येऊन पाहिले त्यावेळी त्या नजरेस पडल्या. मला त्यांना असे मारायचे नव्हते, असे मिहीरने सांगितले,’ अशी माहिती चौकशी करणाऱ्या पोलिसांनी दिली. पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्यासाठी मिहीर आणि त्याचा चालक राजऋषी यांची समोरासमोर चौकशी केली. तसेच त्यांना बोरिवलीपासून मरीन ड्राइव्हपर्यंत आणि अपघातस्थळी नेले. मात्र रविवारी पहाटे नशेत असल्याने मिहीरला त्या वेळी काय झाले, हे आठवत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिहीरच्या चौकशीत….
– दुर्घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पाहून मिहीरचा डोक्याला हात
– बंपरमध्ये महिला अडकल्याचे कळलेच नाही
– नशेत असल्याने अनेक गोष्टी आठवतच नाहीत
दोनदा मद्यप्राशन
मिहीरने एकदा नव्हे, तर शनिवारची रात्र ते रविवारची पहाट या कालावधीत दोनदा मद्यप्राशन केल्याचे तपासातून समोर आले आहे. जुहू येथील बारमध्ये व्हिस्कीचे ६० मिलीचे चार पेग रिचवल्यानंतर मिहीर घरी गेला. सर्व मित्रांना सोडले आणि मर्सिडीज ठेवून तो चालक राजऋषी बिडावत याच्यासोबत बीएमडब्ल्यू कार घेऊन मरीन ड्राइव्हच्या दिशेने निघाला. वाटेत मालाडच्या साईप्रसाद बारमध्ये पहाटेच्या सुमारास त्याने बिअरचे चार टिन खरेदी केले. मरीन ड्राइव्ह येईपर्यंत ते टिन त्याने कारमध्ये रिचवले. राजऋषी यालाही त्याने बिअर देऊ केली, मात्र त्याने पिण्यास नकार दिला.
राजऋषी न्यायालयीन कोठडीत
चालक राजऋषी याची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला गुरुवारी शिवडी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी त्याची कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. मात्र न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यामुळे राजऋषी याला आता जामिनासाठी अर्ज करणे शक्य होणार आहे.
ओळखीमुळे मिहीरला बारमध्ये घेतले
जुहू येथील ‘व्हाइस ग्लोबल तपास’ या बारमध्ये २५ वर्षे पूर्ण नसतानाही मिहीरला दारू देण्यात आली. याबाबत चौकशी केली असता, त्याचा एक मित्र नियमित त्या बारमध्ये जात असल्याने कर्मचारी त्याला ओळखतात. त्याला ओळखीने आतमध्ये घेण्यात आले आणि दारू देण्यात आली, असे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.