WITT 2025 : संपूर्ण दक्षिण भारतात हिंदी लादली नाही, भाषिक वादावर केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांचा दावा

G. Kishan ReddyImage Credit source: Tv9 Bharatvarsh

दक्षिण भारतात कोणावरही हिंदी लादलेली नाही. मी स्वतः दक्षिण भारताचा आहे, पण हिंदी बोलण्याचा प्रयत्न करतो. हिंदी शिकलो नाही, पण हिंदी शिकण्याचा प्रयत्न केला आहे. जे लोक स्वातंत्र्यापासून हिंदीच्या विरोधात बोलत आहेत, त्यांना हे समजले पाहिजे की मोदी सरकारच्या मागील 10 वर्षांमध्ये कधीही हिंदी शिकणे अनिवार्य केलेले नाही, असं रोखठोक प्रतिपादन केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी केलं. टीवी9 च्या ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे’ समिटच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात जी. किशन रेड्डी यांनी भाषिकवादावरून दक्षिणेतील नेत्यांना चांगलंच फटकारलं.

काँग्रेसच्या काळातही लोक ‘अँटी हिंदी’ आंदोलन करत होते. पण केंद्र सरकारने कधीही कोणावर हिंदी बोलण्याचा दबाव नाही टाकला, उलट मातृभाषेला प्रोत्साहन दिले. देशात विविध मातृभाषा आहेत. नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. येत्या निवडणुकांसाठी स्टालिन भाषेच्या मुद्द्यावर राजकारण करत आहेत, असा आरोप जी किशन रेड्डी यांनी केला.

स्टॅलिन राजकारण करताहेत

एम.के. स्टालिन चार वर्षांपासून सत्तेत आहेत. या चार वर्षांत त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही. निवडणुका येत आहेत, म्हणूनच कुटुंबवाद, भ्रष्टाचार, लिकर घोटाळ्यापासून बचाव करण्यासाठी केंद्र सरकारवर, पंतप्रधान मोदींवर आणि हिंदीवर टीका करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते ‘अँटी हिंदी’च्या नावावर तामिळनाडूमध्ये मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

कोणत्याही भाषेकडे दुर्लक्ष नाही

आपण कोणत्याही भाषेकडे दुर्लक्ष करत नाही. सर्व मातृभाषांना प्रोत्साहन दिलं जातं. मोदी जी जिथे जातात, तिथे त्या राज्याची भाषा वापरून भाषण सुरू करतात. मोदी जी मातृभाषेला खूप आदर देतात, मग ती तमिळनाडू असो, केरळ असो, तेलंगणा असो, कर्नाटका असो, बंगाल असो किंवा महाराष्ट्र असो… प्रत्येक ठिकाणी त्या राज्याच्या भाषेचा आदर करतात आणि मग भाषण देतात, असं सांगतानाच तमिळ जनतेमध्ये ‘अँटी हिंदी’ असं काही नाही. तमिळ चित्रपट हिंदीत डब करून संपूर्ण देशात दाखवले जातात, असंही ते म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)