Tanisha Bhise death case: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गर्भवती महिला तनिषा सुशांत भिसे यांच्या मृत्यूनंतर अनेक आरोप होऊ लागले. या आरोपांची चौकशी करण्यासाठी चार सदस्यांची समिती नेमली. या समितीने अहवाल सादर केला. त्यातून अनेक बाबी उघड झाल्या. तसेच महिलेच्या नातेवाईकांना दीनानाथ रुग्णालयातून ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला का दिला? त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर, डॉक्टर अनुजा जोशी, डॉक्टर समीर जोग, सचिन व्यवहारे या चार जणांची चौकशी समिती होती. समितीने अहवालात महिलेची संपूर्ण वैद्यकीय माहिती दिली आहे. त्यात म्हटले की, तनिषा भिसे या 2022 पासून रुग्णालयात वेळोवेळी उपचार व सल्ला घेण्यासाठी येत होत्या. 2022 मध्ये त्यांची रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती. 2023 साली या रुग्णाला रुग्णालयातर्फे सुखरूप गर्भारधारणा व प्रसुती होण्याची शक्यता नसल्याने स्पष्ट सांगितले. तसेच मूल दत्तक घेण्याविषयी सल्ला देण्यात आला होता.
सर्व रुग्णालयांमध्ये असा संकेत असतो की आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी कमीत कमी तीन वेळा करून घेणे आवश्यक असते. ती तपासणी त्यांनी या रुग्णालयात केला नाही. त्यानंतर 15 मार्च रोजी इंदिरा आयव्हीएफ सेंटरचा रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टर सुशांत घैसास यांना भेटल्या. त्यावेळी डॉक्टर घेसास यांनी त्यांना अतिशय जोखमीच्या व धोकादायक प्रसृतीबद्दल माहिती दिली. तसेच दर सात दिवसांनी तपासणीस बोलावले. त्याप्रमाणे त्यांनी 22 तारखेस येणे अपेक्षित होते. परंतु तेव्हा त्या आल्या नाहीत. 28 मार्च 2025 शुक्रवार रोजी सकाळी साडेअकरा वाजता त्या बाह्य रुग्ण विभागात आल्या. त्यांना आपत्कालीन किंवा लेबर रूम मध्ये आल्या नव्हता.
दहा-वीस लाख खर्च येणार
डॉक्टर घैसास यांनी तनिषा यांची तपासणी केली. त्या पूर्णपणे नॉर्मल होत्या. त्यांना कुठल्याही तातडीचा उपचाराची गरज नव्हती. परंतु जोखमीच्या शक्यता लक्षात घेऊन त्यांना भरती होण्याचा सल्ला दिला होता. त्याचबरोबर प्रेग्नेंसीमधील धोक्याची माहिती देण्यात आली. तसेच नवजात अर्भक कक्षाच्या डॉक्टरांशी त्यांची भेट करून देण्यात आली. कमी वजनाची सात महिन्यांची जुळी मुले जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी दोन ते अडीच महिने NICU चे उपचार लागतील,हे समजावून सांगितले. दहा ते वीस लाख रुपये खर्च येऊ शकतो त्याची कल्पना देण्यात आली. त्यावर रुग्णांच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या व मी प्रयत्न करतो असे सांगितले.
ससून रुग्णालयाचा का दिला सल्ला
रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना फोन केला. त्यांना अडचण सांगितली. त्यावर डॉक्टर केळकर यांनी जमतील तेवढे पैसे भरा, म्हणजे मी डॉक्टर घैसास यांना सांगतो, असे सांगितले. रुग्णाच्या कोणीही नातेवाईक प्रशासन अथवा चारिटी डिपार्टमेंट भेटले नसल्याचे अहवालात म्हटले आहे. डॉक्टर केळकर यांचे ऑपरेशन संपले व त्यांनी डॉक्टर घैसास यांना फोन केला तेव्हा त्यांनी रुग्ण न सांगता निघून गेल्याचे कळवले. त्यामुळे डॉक्टर घैसास यांना असे वाटत होते की रुग्ण पैशाची तजवीज करत आहे. परंतु पैशांची तरतूद न झाल्याने रुग्णाच्या पतीला ससून येथे जाण्याचा सल्ला दिला होता. महिलेची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया व होणाऱ्या अपुऱ्या वाढीच्या गर्भाची ससून येथील एनआयसीयूमध्ये व्यवस्थित सोय होईल.
दरम्यानच्या काळात एका नर्सने रुग्ण नातेवाईक आपली बॅग उचलून चालत गेल्याचे सांगितले. थोड्या वेळाने रुग्णाच्या नातेवाईकाकडून काहीच हालचाली न झाल्याचे डॉक्टर घैसास यांनी रुग्णाच्या पतीला फोन केला. तेव्हा त्यांनी उचलला नाही. त्यामुळे 28 मार्चच्या दुपारनंतर रुग्णाचे काय झाले याबद्दल डॉक्टर घैसास व रुग्णालय प्रशासन यांना काहीच कल्पना नव्हती.
काय आहे निष्कर्ष
समितीचा निष्कर्ष चार बाबींवर आहे. रुग्णासाठी जुळव्या मुलाची प्रसृती धोकादायक होती. त्याबद्दलची माहिती रुग्णालयाने दिल्यावर पहिले सहा महिने रुग्णालयात आल्या नाहीत. रुग्णालयात आगावू रक्कम भरण्यास सांगितल्याच्या रागातून तक्रार केलेली दिसते. रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले जसे मानले नाही तसे वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला पण त्यांनी पाळला नाही.