छावा करमुक्त का करत नाही? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत दिले कारण

छावा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठा आरोप केला आहे. सावरकर, गोळवलकर यांनी संभाजी राजेंची बदनामी केली. यामुळे देवेंद्र फडणवीस हा चित्रपट करमुक्त करत नाही, असा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात करमणूक कर २०१७ मध्येच रद्द केला. त्यामुळे राज्यात करमणूक कर नाही, असे स्पष्ट केले होते.

चित्रपटावर आक्षेपाचे कारण नाही…

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, छावा चित्रपट कादंबरीवर आधारित आहे. त्याला सगळे संदर्भ आहेत. ही कादंबरी एक ठेवा आहे. या कादंबरीवर चित्रपट असेल तर त्यावर कुठलाही आक्षेप नोंदवण्याची गरज नाही. मी काँग्रेसतर्फे हा चित्रपट करमुक्त करण्याची विनंती शासनाला केली होती. पण त्यावर काही झाले नाही. मात्र संभाजी राजे यांची बदनामी सावरकर, गोळवलकर गुरुजी आणि चिटणीस यांची बखर यात मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. या बदनामीचा समर्थन म्हणून फडणवीस हा चित्रपट करमुक्त करत नाही, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

नाशिक धार्मिक स्थळाबाबत निर्माण झालेल्या तणावावर सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कुठे बेकायदेशीर असेल त्यावर कारवाई करावी. पण हे सरकार दंगली घडवून आणत आहे. दंगली घडवण्याकडे सरकारचा कल आहे.

रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडणार नाही…

रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे नेते आहेत. ते वैक्तिक कामासाठी एकनाथ शिंदे यांना भेटले. त्यांनी स्टेटसवर भगवा ठेवला तर गैर काय? माझे त्यांच्याशी बोलणे झाले, ते काँग्रेस सोडून कुठे जाणार नाहीत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले. बेळगावसह इतर गावांसंदर्भात महाराष्ट्र कर्नाटकमध्ये जुना वाद आहे. यावर तोडगा निघाला पाहिजे. महाराष्ट्र एकीकरण समितीची आणि काँग्रेसची भूमिका एकच आहे, असे सपकाळ यांनी म्हटले.

बुलढाण्यात अफूची शेती पकडली गेली. ती राज्यातील सगळ्यात मोठी कारवाई होती. या मागे राजकीय व्यक्ती असल्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाली आहे, असे काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)