वय 34 वर्ष, अविवाहित ते लक्ष्मीतारा कंपनी; वैष्णवीचा सतत छळ करणारी नणंद, हगवणेंची ‘करिश्मा’ आहे तरी कोण?

वैष्णवी हगवणे हिनं तिच्या सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या वडिलांनी अनिल कस्पटे यांनी वैष्णवीचा तिचा नवरा शशांक, सासू लता, नणंद करिश्मा, सासरा राजेंद्र आणि दीर सुशील यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार दाखल केली. यातूनच तिनं हे टोकाचं पाऊल उचललं असं ही सांगितलं. तसेच हगवणेंची थोरली सून मयूरी जगतापने देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. तिने वैष्णवीचा सर्वाधिक छळ नणंद करिश्माने केला असेल असे म्हटले आहे. त्यानंतर करिश्मा ही आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

करिश्मा हगवणे, वैष्णवीची नणंद या प्रकरणात मुख्य आरोपींपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे. ती हगवणे कुटुंबातील पहिले अपत्य आहे. ती 34 वर्षांची असून अद्याप अविवाहित आहे. पण घरातले सगळे निर्णय तिच घेते, असं म्हणतात. ती ‘पिंकीताई’ म्हणून ओळखली जाते. वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी करिश्माने तिला धमकावले आणि त्रास दिला, असा आरोप आहे.
वाचा: माझे पती नसताना हे लोक…; हगवणे कुटुंबीयांच्या मोठ्या सुनेचा खळबळजनक खुलासा

काय करते करिश्मा?

करिश्मा ही फॅशन डिझायनर आहे. लक्ष्मीतारा या नावाने तिने एक कंपनी सुरु केली आहे. करिश्मा ही पालकांसोबतच मुळशीमध्ये राहाते. संपूर्ण हगवणे कुटुंबावर करिश्माची सत्ता होती. घरात कोणी कोणाशी कसं वागायचे हे करिश्मा ठरवत असे. धक्कादायक गोष्ट म्हणजे वैष्णवी आणि मयूरी एकाच छताखाली राहात असताना देखील करिश्माने त्यांना एकमेकींशी बोलण्यास, भेटण्यास मनाई केली होती.

करिश्माचा त्रास फक्त वैष्णवीपुरता मर्यादित नव्हता. हगवणे कुटुंबाची दुसरी सून, मयुरी जगतापने करिश्मावर गंभीर आरोप केले. मयुरी म्हणते की करिश्मा आणि तिच्या कुटुंबाने तिलाही मारहाण केली, मानसिक छळ केला. गावात कोणाशी बोलू नये म्हणून करिश्मा आणि तिची आई लता मयुरीला अडवायच्या. वैष्णवीच्या बाळाला मयुरीला भेटू द्यायचे नाहीत, असेही तिने सांगितले. मयुरीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पौड पोलिसांत तक्रार दाखल केली होती, पण राजकीय दबावामुळे ती दाबली गेली, असा तिचा दावा आहे.

वैष्णवीच्या बाळाचं काय?

वैष्णवीचे १० महिन्यांचे बाळ आता तिच्या माहेरच्या कस्पटे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर हा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला बाळ राजेंद्रच्या मावस भावाकडे होते, पण एका अज्ञात व्यक्तीने ते कस्पटे कुटुंबाला दिले. बाळाच्या ताब्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबाला निलेश नावाच्या व्यक्तीने धमकावल्याचा आरोपही आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)