वैष्णवी हिने आत्महत्या केल्याची माहिती समोर येताच महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी सासू लता आणि नणंद यांना अटक केली आहे. तर फरार असलले सासरे राजेंद्र आणि सुशील यांना आज अटक करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. ‘आज सकाळी आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे. हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी पोलीस करतील.’
‘छळ करून आत्महत्या करायला लावणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाही. या प्रकरणी जे करता येईल ते करू. मकोका लावण्यासाठी काही नियम आहेत. नियमात बसलं तर मकोका लावू शकतो. पण मकोका लागेल की नाही हे आज सांगता येत नाही. त्यावर बोलू शकत नाही.’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे वैष्णवी प्रकरणातील आरोपींवर मकोका लागेल की नाही अद्याप सांगता येत नाही.
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘फार वाईट गोष्ट आहे. आज 21व्या शतकात जेव्हा मुली आणि सूनांमध्ये कोणताही फरक करणं चुकीचं आहे. अशा प्रकारची वागणूक देणं हे अतिशय पाप आहे. ते या ठिकाणी झालं आहे…’ सध्या याप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
मुख्यमंत्री म्हणाले, ‘अजित पवार याप्रकरणी गंभीर नाही असं नाही. कोणत्याही कार्यकर्त्याकडे, समाजात लग्नाला बोलावलं तर आपण जातो. पुढे काय घडणार याची कल्पना आपल्याला नसते. एवढंच सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला… आरोपींना पोलिसांनी पकडलं आहे. पोलिसांनी उचित कारवाई केली आहे. पुढेही उचित कारवाई करतील. आता या प्रकरणाला खूप फाटे फोडता कामा नये. असं देखील फडणवीस म्हणाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. सर्व पुरावे घेत आहोत. दोषारोप करणार आहोत. लॉजिकल एंडला प्रकरण नेणार आहे. वरिष्ठांकडून तशा सूचना आल्या आहेत. त्यामुळे वैष्णवी हगवणे प्रकरणात पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.