‘आमचे चिरंजीव पंकज कुठे गेले काय गेले….’ भुजबळांचा तानाजी सावंतांना खोचक टोला

दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. या बातमीनं चांगलीच खळबळ उडाली. मात्र त्यानंतर ते बेपत्ता झाले नसून, आपल्या मित्रांसोबत बँकॉकला निघाल्याची बातमी समोर आली. मात्र त्यापूर्वी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क करून आपल्या मुलाचं विमान हवेतल्या हवेत फिरवून पुन्हा पुण्याला आणलं.  सध्या या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. आता राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी तानाजी सावंत यांना खोचक टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ? 

आमचे चिरंजीव आमदार पंकज भुजबळ येवल्यातून कुठे गेले काहीच पत्ता नाही. आम्ही काल वाट बघत होतो.  आजकाल काही आमदारांचे मुलं कोण कुठे जाईल, कोण कुठे येईल काही पत्ताच लागत नाही. त्यानंतर मला कोणीतरी सांगितलं की काही नाही पंकज भुजबळ हे मंदिरात गेले आहेत म्हणून, मग मी म्हटलं काही हरकत नाही. पंकज भुजबळ कुठे नाही सापडले तरी ते मंदिरात नक्की सापडणार. आमच्या घरची मंडळी बराच वेळा इथे येतात. दरवर्षी किमान एकदा, कधी दोनदा वेळ काढून आम्ही गाणगापूरला जातो. तुळजापूर आणि पंढरपूर करूनच घरी परततो. असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांच्या प्रकरणात विरोधकांकडून देखील टीका होत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. मोहोळ यांनी फोनाफोनी करून हवेतील विमान परत बोलवलं. तेच मुरलीधर मोहोळ राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करण्यासाठी तत्परता का दाखवत नाहीत? केंद्रीय राज्यमंत्री पदाची पॉवर तिथं का वापरत नाहीत? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)