मुंबईत मॉक ड्रीलदरम्यान काय होणार, ब्लॅकआऊट कुठे आणि कधी? जाणून घ्या A टू Z माहिती

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या बुधवार (7 मे) देशभरात अनेक ठिकाणी मॉक ड्रिल केले जाणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक यांसह 16 जिल्ह्यांमध्ये हे मॉक ड्रील पार पडेल. या मॉक ड्रीलदरम्यान सर्वसामान्य नागरिकांना युद्धासारख्या परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करायचे, याबद्दलचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात सुरक्षेच्या दृष्टीने विशेष तयारी करण्यात आली आहे. मुंबईत उद्या दुपारी 4 वाजता तब्बल 60 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे.

केंद्र सरकारकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देशभरातील शहरांची अतिसंवेदनशील, संवेदनशील आणि सामान्य अशा तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यानुसार मुंबई शहराचे नाव अतिसंवेदनशील श्रेणीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे अधिक सतर्कता बाळगली जात आहे. यानुसार उद्या मुंबई शहरातील निवडक 60 ठिकाणी एकाच वेळी सायरन वाजवले जाणार आहेत. तसेच या मॉक ड्रीलदरम्यान दक्षिण मुंबईतील एका मोठ्या मैदानात नागरिकांना एकत्र जमण्यास सांगण्यात येणार आहे. या ठिकाणी त्यांना युद्धजन्य परिस्थितीत कसे वर्तन करावे. स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल.

मुंबईत कुठे मॉक ड्रील?

केंद्रीय यंत्रणांकडून मिळालेल्या अलर्टनंतर मुंबईतील गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा आणि धार्मिक स्थळांवर विशेष मॉक ड्रील घेण्यात येणार आहेत. या सरावामुळे शहरातील काही भागांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा खंडित केला जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या मॉक ड्रिलचा मुख्य उद्देश युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांची आणि प्रशासनाची तयारी तपासणे असा आहे. तसेच युद्धकाळात नागरिकांना सुरक्षित ठिकाणी त्वरित कसे पोहोचावे याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

एकाच वेळी ब्लॅकआऊट नाही

दरम्यान, या मॉक ड्रिलदरम्यान मुंबईत काही भागांमध्ये ब्लॅकआऊट देखील केला जाणार आहे. नागरी सुरक्षा विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण मुंबई शहरात एकाच वेळी ब्लॅकआऊट केल्यास सामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे उपनगरातील एका लहान भागाची निवड करून तिथे ब्लॅकआऊट करण्याची योजना आखली जात आहे. या काळात त्या विशिष्ट परिसरातील लाईट बंद केले जातील. तसेच अनावश्यक हालचाल थांबवून परिसर निर्मनुष्य केला जाईल.

अधिकृत निवेदन जारी

या मॉक ड्रिल संदर्भात नागरी सुरक्षा विभागाकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. यात मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांविषयी सविस्तर माहिती दिली जाईल. त्यामुळे मुंबईकरांनी अधिकृत माहितीसाठी प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)