केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशावरून थेट पुण्यात मोठी कारवाई, कॉल सेंटरमध्ये काय सुरू होतं?; पुण्यात खळबळ

केंद्र सरकारने चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर तर केंद्र सरकारने अशा चुकीच्या घडामोडींवर अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. आज पुणे येथील खराडी परिसरात तर पोलिसांनी एक कॉल सेंटरवर छापा मारला. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कॉल सेंटरमध्ये असे काय चालत होतं की ज्यासाठी केंद्राला दखल घ्यावी लागली? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

पुण्यातील खराडी परिसरात प्राइड आयकॉन नावची इमारत आहे. या इमारतीमध्ये 9 व्या मजल्यावर बनावट कॉल सेंटरवर सुरू होतं. पुणे पोलिसांनी आज या कॉल सेंटरवर अचानक धाड मारली आणि 123 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरूनच केंद्रीय गृहमंत्रालयाला या सेंटरची तक्रार आली होती. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने पुणे पोलिसांना या सेंटरवर कारवाई करण्याचे आदेश देताच पुणे पोलिसांनी धाड धाड छापे मारत 123 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पुण्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे.

केंद्रकडे तक्रार येताच…

केंद्रीय गृहमंत्रालयाने पुणे पोलिसांना या कॉल सेंटरची माहिती देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पुणे सायबर पोलीस, गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी मिळून ही मोठी कारवाई केली. बनावट कॉल सेंटर प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आलीय आहे. तर 2 जण फरार आहेत. या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या 123 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू आहे. बनावट कॉल सेंटरमध्ये जे मोबाईल, लॅपटॉप ब्लॅकमेलिंगसाठी आणि फसवणूक करण्यासाठी वापरले जायचे ते पोलिसांनी जप्त केले आहेत. एकूण 41 मोबाईल आणि 62 लॅपटॉप पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत.

डीजिटल अरेस्टचा खेळ

या बनावट कॉल सेंटर प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी गुजरातचे असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील काही लोकही यामध्ये सहभागी असल्याचे समजतंय. परदेशातील नागरिकांना या प्रकरणात टार्गेट केलं जायचं आणि डिजिटल अरेस्टची भीती दाखवून फसवणूक केली जायची, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. परदेशातील नागरिकांना डीजिटल अरेस्ट करण्यासाठीच हे बोगस कॉल सेंटर उघडण्यात आलं होतं, असं सूत्रांनी सांगितलं.

तीन महिन्यापासून काम सुरू

या संपूर्ण प्रकरणात करण शेखावत हा मुख्य आरोपी आहेत. त्याच्या या कॉल सेंटरमध्ये 123 लोक काम करत होते. गेल्या तीन महिन्यांपासून या ठिकाणी काम सुरू होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणी पोलीस आता गुन्हा दाखल करत आहेत. आरोपींची कसून चौकशी करण्यात येणार आहे. या लोकांचे कॉल सेंटर आणखी किती ठिकाणी होते? त्यांनी कुणा कुणाला शिकार बनवलं होतं? तसेच या आरोपींचे कुणाशी लागेबांधे आहेत का? याचाही तपास केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)