तुम्ही कधी विचार केला आहे का की, शाळा आणि कॉलेजमध्ये मुलांपेक्षा मुलींना चांगले गुण का मिळतात? अनेक पालक, शिक्षक आणि स्वतः विद्यार्थीही या प्रश्नावर विचार करतात. राजकोट येथील सौराष्ट्र विद्यापीठात याबाबत सखोल अभ्यास करण्यात आला आहे. या संशोधनात 2340 विद्यार्थिनींचा अभ्यास, सवयी आणि यशामागील लपलेली कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
काय आहे कारण?
या अभ्यासातून समोर आलेल्या गोष्टी वाचून तुम्ही देखील आश्चर्यचकित होऊ शकतात. मुलींचे यश हा केवळ योगायोग नसून त्यामागे अनेक मानसिक, सामाजिक आणि वैज्ञानिक कारणे दडलेली आहेत. चला तर मग जाणून घेऊया मुलींना अभ्यासात एवढ्या पुढे नेणारी नेमकी कोणती गोष्ट आहे…
आत्मविश्वास आणि समर्पण: विजयाची पहिली पायरी
संशोधनात असे आढळून आले आहे की मुलींमध्ये अधिक आत्मविश्वास असतो. त्यांना त्यांच्या क्षमतेवर अधिक विश्वास असतो आणि त्यामुळेच त्या अभ्यासात सरस असतात. कधीही अभ्यासात त्या मागे राहत नाहीत. अभ्यासात असे स्पष्ट झाले की 91% विद्यार्थ्यीनींनी मान्य केले की मुलींना त्यांच्या अभ्यासावर अधिक आत्मविश्वास आहे. तर 81% मुलींनी सांगितले त्या अभ्यासासाठी स्वत:ला अधिक झोकून देतात. खरं तर आत्मविश्वास आणि समर्पण ही यशाची पहिली पायरी आहे. जी मुलांमध्ये सर्वात जास्त पाहिली जात आहे.
यश मिळवण्यासाठी समर्पण आणि आत्मविश्वास हा मूळ पाया मानला जातो. जेव्हा एखाद्याला स्वतःवर आत्मविश्वास असतो तेव्हा तो कठोर परिश्रम करण्यापासून मागे हटत नाही. यामुळेच मुली आपला अभ्यासकडे गांभीर्याने लक्ष देतात आणि सातत्याने चांगली कामगिरी करतात.
स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा: यशाच्या दिशेने एक पाऊल
आपला समाज नेहमीच पुरुषप्रधान राहिला आहे. जिथे महिलांना कमी लेखले गेले आहे. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. 95.50% विद्यार्थिनींनी कबूल केले की त्या अभ्यासात चांगले मार्क मिळवू इच्छीतात जेणेकरून त्या स्वतःला सिद्ध करू शकतील. त्यांना जाणीव आहे की शिक्षण हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे त्या त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतात.
गंभीरता आणि मानसिक स्थिरता: लक्ष केंद्रित करण्याची क्षमता
या संशोधनातून आणखी एक मनोरंजक गोष्ट समोर आली ती म्हणजे मुली अभ्यासाच्या बाबतीत अधिक गंभीर आणि स्थिर असतात. 88% विद्यार्थ्यांनींनी सांगितले की, त्या अभ्यासात चांगले मार्क मिळवण्याचा दृढ निश्चय करतात.
92% विद्यार्थ्यांचा असाही विश्वास होता की मुली अधिक मानसिकदृष्ट्या स्थिर असतात. ज्यामुळे त्यांना जास्त काळ लक्ष केंद्रित करता येते. हे एक मोठे कारण आहे की त्यांना विषय लवकर समजतात आणि त्यांच्या अनेक गोष्टी या लक्षात राहतात.
समाज आणि कौटुंबिक अपेक्षा: यशाचे दुसरे कारण
समाज आणि कुटुंब अनेकदा मुलींकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करतात. 72.90% विद्यार्थिनींनी कबूल केले की समाज आणि कुटुंबाच्या अपेक्षांच्या दबावाखाली त्या अभ्यासात जास्त मेहनत घेत असतात. 63.10% विद्यार्थिनींनी सांगितले की, त्यांच्याकडे अभ्यासाची अधिक जबाबदारी असल्याने त्या अधिक चांगली कामगिरी करतात. हा दबाव कधी कधी मानसिक तणावाला कारणीभूत ठरू शकतो, परंतु बहुतेक मुली याला आपली प्रेरणा मानतात आणि पूर्ण ताकदीने पुढे जातात.
मुली हुशार असतात असे विज्ञानही म्हणते का?
या संशोधनात केवळ सामाजिक आणि मानसिक कारणेच नव्हे तर वैज्ञानिक बाजूही पाहण्यात आली. महिलांमधील काही हार्मोनल बदलांमुळे त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो. इस्ट्रोजेन आणि ऑक्सिटोसिन सारखे हार्मोन्स त्यांच्या मेंदूचे काही भाग सक्रिय करतात जे स्मृती आणि शिकण्याची क्षमता वाढवतात. याशिवाय महिलांच्या मेंदूची रचनाही वेगळी असते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यांच्या मेंदूचा हिप्पोकॅम्पस भाग पुरुषांच्या तुलनेत अधिक विकसित असतो, ज्यामुळे स्मरणशक्ती वाढते.