मुंबईत मध्यरात्री पावसाच्या हलक्या सरी, पुढील काही दिवस हवामानाचा अंदाज काय?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. त्यातच मुंबईच्या काही भागांमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी मध्यरात्री हलक्या सरी बरसल्या. मात्र या पावसामुळे दिवसाच्या तापमानात कोणताही फरक पडला नाही. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये वाढलेली आर्द्रता आणि स्थानिक पातळीवरील बाष्पीभवन यामुळे काही भागात हलक्या सरी कोसळल्याचे स्पष्ट केले आहे.

कुलाबा वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, शनिवारी सकाळी कुलाबा वेधशाळेने मुंबईतील किमान तापमान २६.४ अंश सेल्सिअस नोंदवले आहे. हे तापमान सरासरीपेक्षा ०.२ अंशांनी कमी होते. तर सांताक्रूझ वेधशाळेने मुंबई उपनगरातील किमान तापमान २६.४ अंश सेल्सिअस नोंदवले, जे सरासरीपेक्षा १.१ अंशांनी कमी होते. तर दिवसा कमाल तापमानाचा विचार केल्यास कुलाबा येथे ३३.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. जे सरासरीपेक्षा ०.२ अंशांनी कमी होते. त्यासोबतच सांताक्रूझमध्ये कमाल तापमान ३४.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हे तापमान सरासरीपेक्षा ०.७ अंशांनी अधिक होते. यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण मात्र जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. कुलाबामध्ये ७६ टक्के आणि सांताक्रुझ ६७ टक्के आर्द्रता नोंदवण्यात आली.

पावसामुळे मुंबईकरांना थोडा दिलासा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांसाठी मुंबईत कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे कमाल तापमान सुमारे ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान सुमारे २६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या अचानक आलेल्या पावसावर मुंबईकरांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. चेंबूरमधील रहिवासी पृथेश शाह यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “एप्रिलमध्ये हलका पाऊस बघायला मिळणे आश्चर्यकारक आहे. पण दुसऱ्या दिवशी हवामान अधिक उष्ण आणि दमट जाणवले.” असे पृथेश शाह यांनी सांगितले. एकंदरीत, या पावसामुळे मुंबईकरांना थोडा दिलासा मिळाला असला तरी, दिवसाच्या उष्णतेपासून फारसा फरक पडलेला नाही.

८ ते १२ जूनदरम्यान पाऊस

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये दरवर्षी पाऊस हा १० जूननंतर सुरु होतो. पण यंदा ८ ते ११ जून दरम्यान पावसाळा सुरू होण्याची शक्यता आहे. येत्या ८ ते १२ जूनदरम्यान पाऊस सुरु होईल, असा ९२ टक्के अंदाज आहे. गेल्यावर्षी मोसमी पाऊस ९ जून रोजी मुंबईत दाखल झाला होता, तर २०२० मध्ये १४ जून रोजी पावसाचे आगमन झाले होते. पण यावर्षी मुंबईत लवकर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)