शिक्षक भरतीसाठी मंत्रालयात आंदोलन, थेट आत्मदहनाचा इशारा; प्रमुख मागण्या काय?

शिक्षक भरती प्रक्रियेतील विविध मागण्यांसाठी आज मंत्रालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिक्षकांना अडवल्याचे पाहायला मिळाले. यामुळे मंत्रालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर आंदोलकांकडून मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करु असा इशारा दिला. आम्ही गरीब कुटुंबातील असून शिक्षक भरतीसाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. मात्र, शासनाने त्यांना फसवले आहे, असा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

यावेळी काही आंदोलकांनी यावर प्रतिक्रिया दिली. “आम्ही कुठून पैसे भरणार? आम्ही गोरगरीब घरातले आहोत. पैसे कुठून आणायचे? जिल्हा परिषदही जागा देत नाही. आम्ही दोन वर्षांपासून शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करत आहोत. पण आम्हाला शासनाने फसवलं आहे. यात आम्हाला मुख्यमंत्री मदत करू शकतात. त्यामुळे आम्ही इथे आलो. जर आज आम्हाला मुख्यमंत्र्यांनी मदत केली नाही, तर आम्ही आत्मदहन करणार. आमचा जीव संपवणार, कारण या शासनाने आम्हाला रस्त्यावर झोपण्याची वेळ आणली आहे. आज आम्हाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे.” अशी एका आंदोलनकर्त्याने प्रतिक्रिया दिली.

प्रमुख मागण्या काय?

१) जिल्हा परिषदांच्या १० टक्के पद कपात केलेल्या जागा तात्काळ पवित्र पोर्टलवर जाहिरात करून भरण्यात याव्यात.
२) रिक्त, अपात्र आणि गैरहजर राहिलेल्या जागाही जाहिरातीत समाविष्ट करून चालू भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवावी.
३) पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी प्राधान्यक्रम (प्रेफरन्स) भरण्याची मुदत वाढवावी.
४) चालू दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती केवळ २०२२-२३ च्या संच मान्यतेनुसार करून जिल्हा परिषदांच्या जागा याच टप्प्यात देण्यात याव्यात.

आंदोलक काय म्हणाले?

जर आमच्या मागण्या तातडीने मान्य झाल्या नाहीत, तर आम्ही आत्मदहन करु आणि रस्त्यावर आपले जीवन संपवू. “आमच्या रक्ताच्या थेंबांवर हा अन्याय लिहिला जाईल. आज तुम्ही जर ऐकलं नाही, तर उद्या तुमच्या हृदयात फक्त पश्चात्ताप राहील. एक शिक्षक घडवणं म्हणजे एक पिढी घडवणं असतं… आणि आज तुम्ही तीच पिढी गमावत आहात.” असे शिक्षक भरतीसाठी आलेल्या आंदोलकांनी म्हटले.

मंत्रालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण

याबद्दल शासनाने सहानुभूतीपूर्वक आणि गांभीर्याने याबद्दलच्या मागणीचा विचार करावा. जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यात कपात केलेल्या १० टक्के तसेच रिक्त, अपात्र आणि गैरहजर जागा पूर्ण क्षमतेने सध्याच्या चालू भरती प्रक्रियेत समाविष्ट करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून त्यांना त्यांच्या हक्काची नोकरी मिळू शकेल. या आंदोलनामुळे मंत्रालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)