मुंबईकरांनो पुढील दोन दिवस महत्त्वाचे, हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज काय?

कुठे कुठे मुसळधार? हवामान खात्याचा इशारा काय?
Image Credit source: social media

राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असताना दुसरीकडे मात्र अवकाळी पावसाचे सावट पाहायला मिळत आहे. सध्या मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढील एक ते दोन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील मुंबईसह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील काही भागांमध्ये अजूनही उष्णतेची लाट कायम आहे. मात्र, राज्यातील इतर अनेक भागांमध्ये लवकरच पावसाची हजेरी लागणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळेल.

राज्यात पावसाळी वातावरण

काही दिवसांपूर्वी पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. मात्र आता तो निवळला आहे. राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा अजूनही ४० अंशांच्या आसपास आहे. मात्र, किनारपट्टीवरील तापमानात गेल्या काही दिवसांपासून घट होत आहे.

राज्यात कुठे-किती तापमानाची नोंद? (अंश सेल्सिअस )

  • सांताक्रूझ – ३३.२
  • कुलाबा- ३३.६
  • डहाणू – ३५. ५
  • पालघर- ३२.६
  • ठाणे – ३७.६
  • रत्नागिरी – ३३.६
  • मालेगाव – ४१.८
  • नाशिक – ३८.१
  • सोलापूर – ४१

दरम्यान मुंबई आणि आसपासच्या किनारपट्टी भागात पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा आराम मिळू शकेल. मात्र राज्यातील इतर भागांमध्ये उन्हाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांना पाणी कपातीच्या संकटातून दिलासा 

तर दुसरीकडे मुंबईकरांना संभाव्य पाणी कपातीच्या संकटातून दिलासा मिळाला आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) केलेल्या मागणीनुसार, राज्य सरकारने मुंबईसाठी राखीव पाणीसाठा मंजूर केला आहे. यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार नाही. राज्य सरकारने ऊर्ध्व वैतरणा धरणातून ६८ हजार दशलक्ष लीटर आणि भातसा धरणातून १ लाख १३ हजार दशलक्ष लीटर इतका राखीव पाणीसाठा देण्यास मान्यता दिली आहे.

मुंबई महापालिकेने गेल्यावर्षी देखील अशाच प्रकारे राखीव पाणीसाठा मागितला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख धरणांमधील एकूण पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या या सर्व धरणांमध्ये मिळून केवळ ३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जर पावसाळा लांबला, तर मुंबई महापालिकेला या राखीव पाणीसाठ्याचा वापर करावा लागणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)